कोकण किनारपट्टीवर मागील संपूर्ण आठवड्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे समुद्रामध्ये वेगवान वारे वाहू लागले होते. त्यामुळे खोल समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मच्छीमारी नौका बंदरातच उभ्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये मच्छीमारांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. परंतु, या आठवड्यात वातावरण निवळल्यामुळे मच्छीमारांनी मासेमारीला पुन्हा प्रारंभ केला आहे.
सध्या समुद्रात झालेल्या पूरक वातावरणामुळे पर्ससिननेटसह ट्रॉलर्स्, गिलनेटने मासेमारी करणार्यांना बांगडा, सुरमई मासा मोठ्या प्रमाणात मिळत आहे. या जाळ्यात सापडणार्या माशांमध्ये सर्वात जास्त उष्टया बांगडयांचा समावेश आहे. ५० ते १०० डिश प्रमाणे मासा मिळू लागल्याने मागील दोन वर्षांपासून आणि ठराविक कालावधीमध्ये झालेले नुकसान भरून निघत आहे.
निसर्गाच्या विविधतेमुळे मासेमारी व्यवसाय अक्षरश: बंद पडत आल्यामुळे त्याचा मोठा दणका मच्छीमारांना सहन करावा लागत होता. दिवसाचा आणि खलाशांचा खर्च पूर्ण अंगावर पडत असल्याने व्यवसायात घाटाच जास्त प्रमाणात होत होता. गेल्या चार दिवसात मुबलक प्रमाणात मासा मिळू लागल्याने मच्छीमारांचा जीव भांड्यात पडला आहे. गुरुवारी सकाळपासून काळबादेवी ते जयगड या परिसरातील किनारी भागात उष्टी बांगडी मोठ्या प्रमाणात मिळू लागली आहेत. त्यामुळे हा मासा पकडण्यासाठी जिल्ह्याच्या काना कोपर्यातील मच्छीमार तुटून पडले आहेत. शेकडोच्या संख्येने मासेमारी करणार्या मच्छीमारी नौकांचे ग्रुप किनार्यावरून मासे पकडताना पाहायला मिळत होते.
मासळी पकडण्यासाठी गुरुवार दिवसभर आरे-वारे, गणपतीपुळे, जयगड किनार्यापासून काही अंतरावर मच्छीमारांच्या उड्या पडल्या असून, मच्छीमारी नौका मोठ्या प्रमाणात या परिसरात जाळी मारत होते. तीस हजारापासून एक लाखापर्यंतची फिशमिलची बांगडी मच्छीमारांच्या जाळ्यात मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात होते. उष्टी बांगडी फिशमिलला तेल काढण्यासाठी दिली जात आहे. त्याचा दर किलोला १८ रुपये इतका दर मिळत आहे.