केन विल्यमसनने पाकिस्तान दौऱ्यापूर्वी न्यूझीलंड कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले आहे. त्याच्या जागी टीम साऊथीला संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. विल्यमसन वनडे आणि टी-२०चा कर्णधार असेल. न्यूझीलंडचा संघ पुढील आठवड्यात पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे.
टॉम लॅथमला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. विल्यमसनच्या अनुपस्थितीत लॅथमने आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्णधारपदही भूषवले आहे. टीम सौदीने ३४६ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने २२ टी-२० सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. टीम साऊदी हा न्यूझीलंड क्रिकेट संघाचा ३१वा कसोटी कर्णधार आहे.
दुसरीकडे, कसोटी कर्णधारपद सोडण्याबाबत विल्यमसन म्हणाला, ‘मी कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवले, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. माझ्यासाठी कसोटी क्रिकेट हे सर्वोच्च श्रेणीचे आहे आणि मी कर्णधारपदाचे आव्हान स्वीकारले आहे. कर्णधार म्हणून तुमचे काम, कामाचा ताण वाढतो. माझ्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर, मला वाटले की कसोटी कर्णधारपद सोडण्याची हीच योग्य वेळ आहे.
ब्रेंडन मॅक्युलमनंतर केन विल्यमसनने २०१६ मध्ये संघाचे कसोटी कर्णधारपद स्वीकारले. त्याने ३८ वेळा संघाचे नेतृत्व केले, त्यापैकी २२ वेळा त्याने संघाला विजय मिळवून दिला. आठ कसोटी अनिर्णित राहिल्या. विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने भारताचा पराभव करून पहिले जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकले.
पाकिस्तान दौऱ्यावर न्यूझीलंडला दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. वनडे मालिकेसाठीचा संघ अद्याप जाहीर झालेला नाही. या दौऱ्याची सुरुवात २६ डिसेंबरपासून कराची कसोटीने होणार आहे. दुसरी कसोटी पुढील वर्षी ३ ते ७ जानेवारी दरम्यान मुलतानमध्ये खेळवली जाईल. तिन्ही एकदिवसीय सामने कराचीत होणार आहेत. पहिला वनडे १० जानेवारी, दुसरा १२ जानेवारी आणि तिसरा १४ जानेवारीला खेळवला जाईल.