कोरोनाच्या महामारीमुळे मागील दीड वर्षापासून सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. सगळीकडे ऑनलाईन शिक्षण तंत्राचा अवलंब करण्यात आला आहे. ऑनलाईन शिक्षण पध्दतीचा अवलंब केल्याने शिक्षण संस्थांचा इतर प्रत्यक्ष शाळा सुरु असताना होणारा खर्च झालेला नाही, परंतु, तरीही अनेक शिक्षण संस्थानी पालकांच्या मागे संपूर्ण फी भरण्यासाठी तगादा लावला आहे. अधिक करून इंग्रजी माध्यम आणि नामांकित शाळांकडून मोठ्या प्रमाणात फी आकारण्यात येत आहे.
कोरोनाच्या संकटामुळे अनेक पालकांच्या नोकर्या गेल्या आहेत, आणि लॉकडाऊन, वर्क फ्रॉम होममुळे सध्या कुठेही नवीन ठिकाणी भरती होणे शक्य नसल्याने अनेकजण बेरोजगार झाले आहेत. अनेक प्रकारच्या आर्थिक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत आहे. उत्पन्नाचे साधन बंद असल्याने असलेल्या बचतीच्या पैश्यामधूनच गुजराण करावी लागत आहे. त्यामुळे घरखर्चापासून ते पाल्यांच्या शैक्षणिक वर्षाच्या फी चा सुद्धा खर्च त्यामध्येच भागविणे कठीण बनले आहे.
काही शैक्षणिक संस्था त्याला अपवाद सुद्धा असतात, सध्याची कोरोनाची भयावह परिस्थिती लक्षात घेता, चिपळूणमधील मेरी माता इंग्रजी माध्यम प्रशालेच्या पालकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. उपसभापती शिंदे आणि मेरी माता व्यवस्थापक यांच्यामध्ये यांच्या झालेल्या बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतला गेला आहे. कोरोना काळात सामाजिक बांधिलकीचे ध्यान ठेवत, ज्या पाल्यांनी आपले दोन्ही पालक या कोरोना महामारीमध्ये गमावले आहेत आणि ज्या पालकांनी कोरोनामुळे नोकरी गमावली आहे, अशा पाल्यांची संपूर्ण फी माफ करण्यात आली आहे. तसेच उर्वरित विद्यार्थ्यांची २५% फी माफ करण्यात आली आहे. शिक्षण संस्थेच्या या निर्णयामुळे साधारण १४३ विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ करण्यात आली आहे.