देशात रस्त्यांची मालिका उभी करणाऱ्या केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाबाबत नाराजी व्यक्त करीत आजवर आपण अनेक प्रकल्प पूर्णत्वास नेले मात्र मुंबई- गावा महामार्गाचे काम पूर्ण करू शकलो नाही, अशी खंत व्यक्त केली. आज मी हवाई पाहणी केली आहे. १० पैकी ७ टप्प्यांचे काम रखडले आहे. जानेवारी २०२४ मध्ये कोकणवासीयांचे स्वप्न पूर्णत्वास जाईल, असा विश्वास ना. नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी गुरूवारी रत्नागिरी दौऱ्यावर होते. दुपारी एमआयडीसी रेस्टहाऊसवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन आदी उपस्थित होते. ना. गडकरी म्हणाले, मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ हा कोकणातील प्रमुख पर्यटन स्थळांना जोडणारा महामार्ग आहे. यामुळे पर्यटन विकासाला चालना मिळेल. प्रमुख औद्योगिक क्षेत्रांना जोडणारा हा मार्ग असल्याने औद्योगिक विकासालाही चालना मिळेल. सुधारित रस्ता सुरक्षा प्रणालीमुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल. हे प्रकल्प जिल्ह्याच्या, राज्याच्याच नाही तर.देशाच्या व्यापारवृद्धीत व सर्वसमावेशक प्रगतीमध्ये महत्त्वाचा वाटा उचलतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.महामार्गाची पाहणी दरम्यान, गुरूवारी आपण मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ ची राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह पाहणी केली. भूसंपादन प्रक्रिया, भूसंपादन मोबदला वाटपातील विलंब व वन्य जमिनीच्या मंजूरीस झालेला विलंब यामुळे हे काम वेळेत पूर्ण होवू शकले नाही, परंतु सर्व अडचणींवर. मात करून हे काम आता प्रगतीपथावर आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागांतर्गत मुंबई-गोवा महामार्गाची इंदापूर ते झारप या भागांतील १० पॅकेजेसमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या १० पॅकेजेसची एकूण सुधारित किंमत १५ हजार ५६६ कोटी आहे. एकूण ३५६ किमी लांबीच्या महामार्गावरील २५० किमी मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
रत्नागिरीतील कामे रखडली
दहा टप्प्यांपैकी रत्नागिरी जिल्ह्यातील आरवली ते कांटे टप्पा ६ आणि कांटे ते वाकेड टप्पा ७ या दोन टप्प्यांचे कामे रखडली आहेत. या कामासाठी नेमलेल्या कंपन्यांनी वेळेत काम न केल्यामुळे त्यांना टर्मिनेट करून नवीन कंपन्यांना काम दिले आहे. त्यांना डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
रोड सेफ्टीचे ऑडिट
रोड सेफ्टीचे ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनेक ठिकाणी गावांना रस्ते आहेत. त्यांना महामार्गावर येणे-जाणे सुरक्षित होईल. तसेच कोणतेही प्राणी अचानक रस्त्यावर येऊन अपघात घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बांबूने अशा प्रकारच्या वाटा बंदीस्त करण्यास सांगितले आहे.
कुणाच्या खांद्यावर, कुणाचे ओझे
कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे,असे मिश्किलीत बोलून गडकरी म्हणाले, मुंबई-गोवा महामार्गाचे काम २०११ मध्ये अन्य सरकार असताना सुरू झाले. परंतु आता त्यांना दोष देणार नाही. त्यानंतर अनेक ठेकेदार नेमले, अनेक कंपन्यांना टर्मिनेट केले. परंतु आता देर आये दुरूस्त आये. आता काम पूर्णत्वाकडे घेऊन जाणे हा एकच उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.