खेड तालुक्यातील सहा गावांना टंचाईची झळ बसली आहे. या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी अनेक ठिकाणी पाऊस पडल्यानंतर आता तालुक्यात कडक ऊन पडू लागल्याने उकाडा असह्य होत आहे. त्यामुळे पाण्याचे स्रोत आटू लागले आहेत. तालुक्यातून बारमाही वाहणाऱ्या भरणे जगबुडी नदीपात्रात सद्यःस्थितीत पाण्याचा खडखडाट झाला आहे. नदीपात्र कोरडे पडू लागले आहेत.त्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. ग्रामस्थ टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे धाव घेत आहेत. भरणे येथील जगबुडी नदीपात्रात निर्माण झालेल्या खडखडाटामुळे पाणीटंचाईचे नवे संकट उभे ठाकण्याची चिन्हे निर्माण झाले आहे. या नदीपात्रातील पाण्याचा वापर जनावरांसह कपडे धुण्यासाठी केला जातो; मात्र नदीपात्रात निर्माण झालेल्या पाण्याच्या खडखडाटामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे.