पावसाळ्यात येणारा पहिला सण म्हणजे वटपौर्णिमा. या दिवसापासूनच खर तर सणांची सुरुवात होते. वटपौर्णिमा सणाची एक पौराणिक कथा आहे. ज्यामध्ये सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमाकडून परत मिळविले. भद्र नामक देशात अश्वपती नावाचा एक राजा राज्य करत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय देखणी, नम्र व सर्वगुण संपन्न मुलगी होती. राजाने सावित्री उपवर झाल्यावर तिलाच आपला पती निवडण्याची मुभा दिली. त्यावेळी सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली.
शाल्व राज्याच्या धृमत्सेन अंध राजाचा सत्यवान हा पुत्र होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासह राजा जंगलात वास्तव्य करत होता. सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे भगवान नारदाला माहिती असल्याने त्याने सावित्रीला सत्यवानाशी विवाह न करण्याचा सल्ला दिला. परंतु, सावित्रीने मनाशी सत्यवानालाचं वरले असल्याने, तिने सत्यवानाशी विवाह केला आणि ती सुद्धा जंगलामध्येच नवऱ्यासोबत राहू लागली. सत्यवानाचे एक वर्षाचे आयुष्य असल्याने मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्रीने त्रिरात्री वटपौर्णिमेचे व्रत करायला आरंभ केले.
सत्यवानाच्या मृत्यूच्या दिवशी सत्यवान आणि सावित्री जंगलात लाकडे तोडण्यास गेले असता, लाकडे तोडता तोडता त्याला घेरी येऊन तो जमिनीवर पडला. तेथे यमराज हजर झाले आणि ते सत्यवानाचे प्राण नेऊ लागले. सावित्रीसुद्धा यमाच्या मागेमागे जाऊ लागली. यमाने तिला माघारी जाण्यास सांगितले असता, तिने ते अमान्य केले. शेवटी कंटाळून यम पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगतो. तेंव्हा सावित्री तिच्या अंध सासऱ्यांसाठी दृष्टी आणि राज्य परत मागते आणि तिसरे वरदान मागताना, मला पुत्रप्राप्ती होऊन सत्यवानाची वंशवृद्धी व्हावी, अशी मागणी करते. त्यामुळे यमराजाने तथास्तु म्हणताच सत्यवानाचे प्राण परत येतात. सावित्री सत्यवानाचे प्राण वडाच्या झाडाखाली मिळविते म्हणून महिला वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात आणि वटपौर्णिमेचे व्रत आचरतात.
आताच्या काळात सुद्धा अनेक सावित्री आपल्याला पहायला मिळतात ज्या आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत आचरतात. सर्व महिला हा सण अतिशय उत्साहाने साजरा करतात. वडाभोवती सात फेऱ्या मारून आणि त्याची विधिवत पूजा करून हे व्रत केले जाते. या दिवशी प्रत्येक महिला आपल्या पतीसाठी उपवास करते आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी त्याच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करतात.