मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील रस्त्यावर चौपदरीकरणा अंतर्गत केलेल्या भरावाच्या ठिकाणी सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटे पडलेल्या पावसाने रस्ता चिखलमय बनला यात अवजड वाहने अडकून पडल्याने मंगळवारी पहाटे 4 वाजता घाटातील वाहतूक ठप्प झाली. रस्त्यावरील चिखल बाजूला केल्यानंतर सकाळी ११ वाजता वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. मात्र या कालावधीत परशुराम घाटासह पर्यायी चिरणी मार्गावर देखील वाहतूक कोंडी झाली होती. या अवकाळी पावसाचा फटका बसल्याने परशुराम घाटातील वाहतूक तब्बल सात तास ठप्प होती.
मध्यरात्री वाहतूक ठप्प – चिपळूण तालुक्यातील पूर्व विभागात सोमवारी सायंकाळी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यानंतर चिपळूण शहर व परिसरात मध्यरात्री ३ वाजल्यापासून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पावसाचा जोर आणखी वाढला. या पावसाचा सर्वाधिक फटका परशुराम घाटाला बसला. या घाटात चौपदरीकरणांतर्गत नव्याने केलेला भराव पावसाच्या पाण्यामुळे चिखलमय बनला. त्यामुळे घाटातून जाणारी अवजड वाहने चिखलात अडकून पडली. घाटात वाहने अडकल्याने तत्काळ वाहतूक थांबविण्यात आली. त्यानंतर चिखल जेसीबीच्या साहाय्याने हटवून त्या ठिकाणी खडी पसरवण्यात आली. त्यामुळे अडकलेली वाहने बाहेर पडली. मात्र उर्वरीत भागात चिखल कायम होता. एकेरी वाहतूक सुरू केली त्यामुळे वाहतूक न सोडता दोन पोकलेनच्या साहाय्याने रस्त्यावरील माती बाजूला करण्यात आली. त्यानंतर परशुराम घाटात एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. यावेळी घाटात दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. येथे वाहतूक पोलिसांना पाचारण करीत टप्प्या-टप्प्याने वाहने सोडण्यात येत होती. तसेच छोटी वाहने पर्यायी चिरणी मार्गाने सोडली जात होती. चिरणी मार्गावर देखील एकाचवेळी वाहनांची गर्दी झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
तोपर्यंत धोका कायम – परशुराम घाटात सध्या दुपारी १२ ते सायंकाळी ५ यावेळेत वाहतूक बंद ठेवून चौपदरीकरणाचे काम करण्यात येत आहे. १० मे पर्यंत या पद्धतीने घाटातील काम चालणार आहे. मात्र अजूनही १०० मिटरपेक्षा अधिक लांबीचे कॉक्रीटीकरणाचे काम शिल्लक आहे. हे काम जोवर पुर्ण होत नाही. तोवर चिखलमय रस्त्याचा धोका कायम राहणार आहे. त्यातच घाटातील अवघड वळणावर असलेला कातळ फोडण्याचे काम अजूनही पुर्ण झालेले नाही. त्यामुळे कॉक्रिटीकरणाला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे वाहतूक सुरू असताना कॉक्रिटीकरणाचे काम करताना मोठी कसरत करावी लागणार आहे.