चिपळूण व खेड हद्दीत २२ जुलै २०२१ च्या महापुरात काही पूल कमकुवत झाले होते. अखेर या पुलांची नव्याने पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातील सात पुलांच्या पुनर्बांधणीचे काम ठेकेदार सुरेश चिपळूणकर यांनी स्वीकारले होते. हे काम त्यांनी अवघ्या सहा महिन्यांत पूर्ण केले. या नव्या पुलांची रुंदी व उंची वाढल्याने पावसाळ्यात ते वाहतुकीस सोयीचे ठरत आहेत. २२ जुलै २०२१ च्या महापुरात चिपळूणमधील रस्ते, साकव, पुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गाववाड्यांचा एकमेकांशी संपर्क तुटला होता. पावसाळ्याअगोदर वाहतूक सुरळीत करण्याचे प्रशासनासमोर आव्हान होते. यातील काही कामे ठेकेदार चिपळूणकर यांनी घेतली होती. या कामांसाठी निधी अपुरा असूनही चिपळूणकर यांनी कामाची जबाबदारी स्वीकारली. पावसाळ्यापूर्वी ही सर्व कामे मार्गी लावल्याने जनतेची गैरसोय दूर होण्यास मदत झाली आहे.
सावर्डे- हडकणी-नांदगाव मार्गावरील पूल, आंबडस-धामणंद मार्गावरील मोठा पूल, वेरळ-खोपी मार्गावरील गर्डर (डुबी) पूल, तिवरे कुंभारवाडी मार्गावरील पूल, कळकवणे-आकले- तिवरे मार्गावरील पूल, अलोरे- पेढांबे-शिरगाव मार्गावरील पूल, गणेशखिंड-सावर्डे- दुर्गेवाडी-तळवडे मार्गावरील पुलाची पुनर्बांधणी करणे आदी कामांचा समावेश होता. गावाकडे जाणारा पूल कमकुवत झाल्याने त्या त्या भागातील वाडीवस्त्यांकडे जाणाऱ्या मार्गाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे कमकुवत झालेल्या पुलांची तातडीने पुनर्बांधणी करण्याची मागणी करण्यात येत होती. या परिस्थितीमुळे गावात त्या पुलांवरून अजवड वाहनांची वाहतूक करतानाही अडचणी येत होत्या. या सर्व बाबींचा विचार करून पुलांची तातडीने पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे अवघ्या सहा महिन्यात हे काम पूर्ण केल्याने पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक सुखकर होणार आहे.