गेल्या वर्षापासून ओढवलेल कोरोनाच संकट लक्षात घेता, अनेकांच्या घरातील कर्ते धर्ते मंडळी गमावली. आई वडिलांविना पोरक्या झालेल्या मुलांच्या पालनपोषण आणि शिक्षणाची जबाबदारी उचलण्याचा शासन प्रयत्न करत आहे. अनेक सामाजिक संस्थांनी अशा कुटुंबाना मदत केली आहे.
राजापूर तालुक्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पितृछत्र हरपलेल्या सोळा मुलांना माय राजापूर संस्थेने मायेचा हाथ दिला आहे. या सोळा मुलांपर्यंत महीना भराचे रेशन, अन्नधान्य, शालेय साहीत्य, रोख रक्कम या स्वरूपात मदत पोहोचवण्यात आली. हि मदत या संस्थेच्या सदस्यांनी स्वत: कडील पैश्याच्या आधारे केली आहे. त्यामुळे मदत करताना सुद्धा त्यांनी टप्प्याटप्प्याने केली आहे. मागील २ वर्षापासून सर्वच आर्थिक अडचणीचा सामना करत आहेत. परंतु, तरीही सामाजिक बांधिलकी म्हणून या माय राजापूर संस्थेच्या वतीने मदत करण्यात आली.
टप्प्याटप्प्याने करण्यात येणाऱ्या मदतीमध्ये पहिल्यादी उन्हाळे, कोंडये येथील कुटुंबीयांना मदत पुरविण्यात आली, तर दुस-या टप्प्यात पेंडखले, वडदहसोळ, वडवली येथील कुटुंबीयांना मदत पुरवली गेली. शेवटच्या तिस-या टप्प्यात भालावली, बेनगी आडीवरे येथील कुटुंबीयाना माय राजापूर संस्थेने मदत पुरवली.
कोरोनामुळे कुटुंबावर अकस्मात ओढवलेल्या या प्रसंगातून प्रत्येक कुटुंबाला मानसिक स्थैर्य देण्याची गरज भासते. कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीमुळे अशा कुटुंबाना कोणाचाही आधार त्यावेळी मिळत नाही. त्यामुळे जर घरातील कर्ता पुरुषच कोरोनामुळे गेला, तर मग पुढे कसे होणार! या विवंचनेने अनेक कुटुंबाची फरफट झालेली दिसत आहे. अनेक महिला पतीच्या निधनाने मानसिक धक्क्यात आहेत. या धक्कातून त्यानी सावरावे व आपल्या संसाराची गाडी पुन्हा नव्या जोमाने रेटावी यासाठी माय राजापूर संस्थेचे सदस्यांनी त्यांच्या घरी जाऊन समुपदेशन केले. यासाठी माय राजापूर संस्थेच्या सर्व महीला सदस्यानी विशेष पुढाकार घेऊन या महिलांना धीर दिला.