रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोना बाबतची काहीशी सकारात्मक आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेचा विळख्यामध्ये रत्नागिरी गुरफटली गेली असताना, हळूहळू का होईना पण हा विळखा सैल होत आहे. शासन राबवत असलेल्या गावोगावच्या सरसकट चाचणी मुळे कोरोना बाधित रुग्ण सापडून, त्यांच्यावर वेळीच उपचार करणे शक्य झाले आहे. तसेच लसीकरण सुद्धा वेगवान गतीने सुरु झाल्याने, कोरोनाला थोपविण्यात शासनाला काही प्रमाणात यश येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संसर्गीतांच्या संख्येत घट होऊन कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.
दररोजचा कोरोना बाधितांचा आकडा पहिला असता, रोजची संख्या साधारण ५०० च्या दरम्यान किंवा त्याहून जास्त असते, परंतु, आजच्या प्राप्त अहवालानुसार, जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णसंख्येत घट झालेली पहायला मिळाली आहे. जिल्ह्यात मागील २४ तासामध्ये ३३१ तर त्या अगोदरच्या ४९ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात तपासणी करण्यात आलेल्या अहवालापैकी पाच हजार तीनेशे अठ्ठ्याणव जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मागील २४ तासामध्ये कोरोनामुळे चौघांचा मृत्यू ओढवला असून, ७४१ बाधित व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत.
आता जिल्ह्यामध्ये नवीन ३८० पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६१ हजार ०२२ एवढी झाली आहे. त्यातील ५३,५७४ जण बरे झाले आहेत. त्यामुळे बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण जास्त असून ते प्रमाण ८७.८८ वर पोहोचले आहे. बाधितांपैकी २३६ जणांची आरटीपीसीआर आणि ९५ जणांची अँटिजेन चाचणी करण्यात आली आहे. रत्नागिरीच्या सर्व तालुक्यामध्ये थोड्या संख्येने पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. परंतु, कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त असल्याने हि नक्कीच रत्नागिरीसाठी दिलासाजनक बातमी आहे.