राज्यात सध्या राजकीय व्यभिचार सुरू आहे… सत्तेसाठी कोणतीही तडजोड सुरू आहे… याचा राग जनतेच्या मनात दिसतो आहे… तडजोड करायची वेळ माझ्यावर आली तर मी प्रसंगी घरी बसेन परंतु असा राजकीय व्यभिचार कधीच करणार नाही’, अशा शब्दात आपली भूमिका मांडताना त्यांनी कार्यकत्यांनाही चांगलेच डोस पाजले. केवळ दारू, मटण पार्टीसाठी निवडणुका लढवायच्या का? असा सवाल करत काम करा, जो काम करणार नाही त्याला पदावरून काढले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. ते चिपळूणमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्याला चिपळूणपासू शुक्रवारी प्रारंभ झाला. चिपळुणात येताच त्यांचे जंग स्वागत करण्यात आले. पुष्पवृष्टी करत जेसीबीच्या सहाय्याने एक भला मोठा पुष्पहार गळ्यात घालून राज ठाकरेंचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर ते हॉटेल अतिथी येथे दाखल झाले.
पदाधिकारी बैठक – मनसेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित अतिथी सभागृहात घेण्यात आली. यावेळी मनसेच नेते माजी आ. बाळा नांदगावकर, सरचिटणीस शिरीष सावंत, माजी नितीन सरदेसाई, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, अविनाश अभ्यंकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थि होते. आपल्या नेहमीच्या शैलीत त्यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
इतर राज्यात बघा आणि इथे बघा – खरे तर खासदारकीची निवडण ‘का’ लढवायची? असा सवाल करीत महामार्गाच्या कामाला २००७ मध्य सुरवात झाली, आज सोळा झाली महामार्गाचे काम पूर्ण झाले का? एका तरी खासदाराने यासंदर्भा आवाज उठवला का? किती खासदार ना. गडकरींना यासंदर्भात भेटले? कशासाठी खासदारकी लढवायची? तर राज्यात बघा… पक्षापक्षाती मतभेद गाडून राज्याच्या जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येत आहेत, असे राज ठाकरे यांनी सांगत महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत एकत्र येण्याची भावना व्यक्त केली.
तर घरी बसेन – सारा देश आपल्या आज मतदारांवर हसतो आहे. राज्यात कशा पद्धतीने तडजोडी कराव्या लागत आहेत, हे बघत आहात ना? सगळया आघाड्या, बिघड्या सुरू आहेत. असल्या घाणेरड्या तडजोडी जर कराव्या लागणार असतील तर मी घरी बसेन, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
हा तर व्यभिचार – राज्यात जो व्यभिचार सुरू आहे… असला व्यभिचार आपण करणार नाही. आज जो राग लोकांमध्ये दिसतो आहे तीच एक आशा आहे. हा राग जिवंत ठेवा, असे आवाहन राज ठाकरे यांनी कार्यकर्त्याना केले.
पदापेक्षा मनाने बोला – पद हे काम करण्यासाठी आहे! पदावरून आदेश देऊन काम होत नाही… पदानी एकमेकांजवळ बोलण्यापेक्षा जर मनाने एकमेकांजवळ बोलणे झाले तर कार्यकर्ते जोडले जातील आणि एकमताने आणि प्रत्येक जण मनापासून काम करेल या साठी मनाने बोला असे राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.
माणसे मोठी करायला आवडतात – मला माणसे मोठी करायल्ड आवडतात. एकटे मोठे होण्यात काहीच अर्थ राहत नाही आपल्या कार्यकर्त्यास आमदार,खासदार नगरसेवक असे करायला आणि बघायला आवडेल. यासाठी आता कामाला लागा असे आवाहनही राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केले.
अन्यथा पदावर – पदावर आल्यानंतर काम करावेच लागेल. पदावर राहावयाचे असेल तर पक्ष सांगेल ते काम करावे लागेल.”अन्यथा पदावर राहता येणार नाही. तुम्ही महिन्याभरात काम काय केले- याची तपासणी केली जाणार आहे. तुमची आता सुटका नाही. केवळ हे एका महिन्यापुरते नाही हे लक्षात घ्या, अशी तंबीही राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिली.
नाका तेथे शाखा – आज कार्यालयाचे उद्घाटन झाले आहे. कामाला जोरात सुरवात झाली आहे. शाखाची निर्मिती झाली पाहिजे खास करून नाका तेथे शाखा स्थापन करा. त्या ठिकाणी आपल्या पक्षाची माणसे थांबली पाहिजे. लोक आपोआप तुमच्याकडे येतील, असे राज ठाकरें यांनी सांगितले.