एका रिक्षाचालकाने महिलेची छेड काढून अश्लील वर्तन केल्याचा प्रकार रविवारी रात्री माळनाका परिसरात घडला आहे. महिलेने रुद्रावतार दाखवत नातेवाईकांना बोलावून घेताच नातेवाईकासह जमावाने त्या रिक्षाचालकाला बडवला. रिक्षाचालकाची जोरदार धुलाई करून त्याला पोलीस स्थानक दाखवले. याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी रत्नागिरीमध्ये एका रिक्षाचालकाने एका प्रवासी तरुणीशी अश्लील वर्तन केल्यानंतर त्या तरूणीने धाडस दाखवत झालेला प्रकार सोशल मीडियावर पोस्ट केला. यामुळे संवेदनशील असलेल्या पोलिस खात्याने तत्काळ त्याची दखल घेऊन सीसी टीव्ही फुटेज आणि मुलीने दिलेल्या माहितीवरून रिक्षाचालकाला ताब्यात घेतले.
अनेक महिला संघटनांनी त्या रिक्षा व्यवसायिकावर कडक कारवाईची मागणी केली. रिक्षा चालकाच्या या हीनकृत्याने त्याची समाजात प्रचंड बदनामी झाली. त्याने असे अनेक प्रकार केल्याचे नंतर उघड झाले. या बदनामीमुळे संबंधित रिक्षाचालकाने आत्महत्या केली. रिक्षा संघटनांनीही या घटनेचा निषेध केला होता. हा प्रकार विस्मरणात जात असताना रविवारी आणखी एका रिक्षाचालकाने प्रवासी महिलेशी अश्लिल प्रकार केल्याचे उघड झाले. महिला प्रवासी मारूती मंदिरच्या दिशेने जात असताना संबंधित रिक्षा चालकाने तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, अशी विचारणा केली. यावरून महिला आणि रिक्षाचालकामध्ये जोरादार वाद झाला.
महिलेने तत्काळ आपल्या नातेवाईकाला फोन करून बोलवुन घेतले. हा प्रकार सांगितल्यानतंर संबंधित नातेवाईकाने माळनाका येथे त्या रिक्षाचालकाला बेदम मारहाण केल्याची जोरदार चर्चा सोमवारी दिवसभर रत्नागिरी शहरात सुरू होती… काही क्षणात त्याठिकाणी मोठा जमाव जमला. महिलेशी अश्लिल वर्तन केल्याचे सांगितल्यानतंर जमावानेही त्याची इथेच्छ धुलाई केली. जमाव झाल्यामुळे तेथे वाहतुक कोंडी झाली. पोलिसांपर्यंत हा विषय गेल्यानंतर तत्काळ घटनास्थळी पोलिस दाखल होऊन रिक्षा चालकाला ताब्यात घेतले. शहर पोलिस ठाण्यात त्या रिक्षा चालकाविरुद्द अदखलपात्र गुन्हा दखल केला आहे. या घटनेची संतप्त चर्चा सोमवारी रिक्षा व्यवसायिकांसह नागरिकांमध्ये दिवसभर सुरू होती.