निरवाडे (ता. चिपळूण) येथे लहान मुलाचा चिरेखाणीत बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार गंभीर आहे. याबाबत संबंधित खाणमालकाला नोटीस काढून कारवाई करण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्या आहेत. जिल्ह्यातील सर्वच चिरेखाणींचा आढावा घेऊन त्या बंदिस्त करण्याबाबत पुन्हा एकदा महसूल विभागाला सूचना केल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चिपळूण येथील घटनेमुळे उघड्या चिरेखाणींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता.
जिल्ह्यात ५६५ चिरेखाणी असून, त्यापैकी किती चिरेखाणी बंदिस्त केल्या आहेत. चिरेखाणींच्या स्थितीचा आढावा खनिकर्म विभागाकडून घेण्यात आलेला नाही. राज्याच्या महसूल व वनविभागाने २३ जानेवारी २००९ ला आदेश काढले होते. चिरेखाणी बंदिस्त करण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत. त्या परिपत्रकानुसार, जिल्हा प्रशासनाने त्या-त्या तहसीलदारांवर चिरेखाणीची जबाबदारी दिली आहे. भाडेतत्त्वाच्या सर्व अटींचे पालन करणे, उघड्या खाणींचे संरक्षण करणे, सोडलेल्या खाणींबाबत काळजी घेणे तसेच तपासणी करणे आदींची पाहणी तहसीलदारांनी करावयाची आहे.
अद्यापही जिल्ह्यातील किती खाणी बंदिस्त करण्यात आल्या आहेत याची माहिती महसूल विभागाकडे उपलब्ध नाही. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाकडून जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. जनहित याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने उघड्या चिरेखाणीच्या सुरक्षेसंबंधी दाखल केलेली प्रतिज्ञापत्र तपासा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे समजते.