‘चांद्रयान – ३’ने शनिवारी चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला आहे, अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने दिली. यान चंद्राच्या सर्वात जवळ असताना सायंकाळी सातच्या दरम्यान कक्षा बदल करण्यात आला. चांद्रयान आता चंद्राभोवती १६६ X १८०५४ किलोमीटरच्या अंडाकार कक्षेत फिरणार आहे. अशा पाच कक्षांमध्ये प्रवेश करून यान २३ ऑगस्टला चंद्रावर उतरविण्याची तयारी ‘इस्रो’ने केली आहे. चांद्रयान उद्या (रविवारी) रात्री ११ वाजता दहा ते १२ हजार किलोमीटरच्या कक्षेत स्थापन केले जाईल.
त्यानंतर येत्या ९ रोजी दुपारी पावणेदोनला ही कक्षा बदलून चार ते पाच हजार -किलोमीटरच्या कक्षेत यान पोहचेल. एक हजार किलोमीटरच्या कक्षेत येत्या १४ रोजी यान प्रवेश करेल. पाचवा कक्षबदल १०० किलोमीटरवरील असेल. येत्या १७ रोजी प्रोपल्शन मोड्यूल आणि लँडर वेगळे होतील. १८ व २० ऑगस्टला ‘डिऑर्बिटिंग’ म्हणजे चंद्राच्या कक्षेचे अंतर कमी केले जाईल. लँडर १०० X ३५ कि.मीच्या कक्षेत पोहोचेल. यानंतर २३ रोजी साधारणपणे सायंकाळी ५.४७ वाजता यान चंद्रावर उतरविण्यात येईल.
वेगावर नियंत्रण – चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यासाठी चांद्रयानाचा वेग सुमारे तीन हजार ६०० कि.मी प्रतितास एवढा ठेवला होता. पृथ्वीच्या तुलनेत चंद्रावरील गुरुत्वाकर्षण सहा पटीने कमी आहे. जास्त वेग ठेवला असता तर यान चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या टप्प्यात आले नसते. म्हणून ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांनी वेग कमी करून दोन किंवा एक कि.मी प्रतिसेकंद केला होता. या वेगामुळे यान चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे स्थापित झाले.