कोकणातील रत्नागिरी आणि परिसरातील भागामध्ये अनेक पर्यटन स्थळे असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटकांची रेलचेल असते. त्यामुळे शासन आणि स्थानिक लॉक सुद्धा या स्थळांच्या सुशोभीकरणावर जास्त प्रमाणात भर देत असतात. सध्या रत्नागिरीमध्ये मालवण, गोवा सारखे वॉटर स्पोर्ट्स देखील सुरु करण्यात आले आहेत. विविध प्रकारचे शाकाहारी, मांसाहारी, मत्साहारी खाद्य पदार्थांची चंगळ असल्याने कोकणाला पर्यटकांची पहिली पसंती.
कोकणामध्ये येण्यासाठी रेल्वे किंवा खाजगी वाहतुकीद्वारे म्हणजेच रोडवे ने पर्यटक येतात. परंतु, आता कोकणासाठी विशेषतः रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे या पर्यटन स्थळासाठी एक आनंदाची बातमी समजली आहे. उडे देश का आम आदमी या मोहिमेअंतर्गत दिल्ली, गुजरात, आसाम, तेलंगणा, आंध्र आणि महाराष्ट्र अशा राज्यांसोबत काही महत्त्वाच्या पर्यटनस्थळांना जोडण्यासाठी सी-प्लेन सेवा सुरू करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे या पर्यटनस्थळाचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर या विकसनशील प्रकल्पामध्ये गणपतीपुळे जोडले जाणार आहे.
जलवाहतूक, नागरी वाहतूक आणि पर्यटन या क्षेत्रासाठी हा नक्कीच उपयुक्त चालना देणारा प्रकल्प ठरणार आहे. त्याचप्रमाणे हि वाहतूक देखील पर्यावरण स्नेही असल्याने त्याला चांगल्या प्रकारे चालना मिळणार हे नक्की. केंद्रीय मंत्री हरदीपसिंग आणि मनसुख मंडाविया यांच्या उपस्थितीत बंदर, नौकावहन व जलवाहतूक मंत्रालय आणि नागरी उड्डाण मंत्रालय यांनी यासाठीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
या प्रकल्पा अंतर्गत मुंबई ते शिर्डी, लोणावळा आणि गणपतीपुळे, सुरत ते द्वारका, मांडवी आणि कांडला, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप या द्वीपसमूहामध्येही सी-प्लेनच्या प्रवासाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये हि वाहतूक प्रदूषणविरहित असल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडणार नाही. पर्यटनस्थळी थेट पोहोचता येणार असल्याने वेळेचीही मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. मोदी सरकारने सी-प्लेन सेवा प्रकल्पांना चालना देण्यासाठी घेतलेला हा निर्णय निश्चितच यशस्वी ठरणार आहे.