25.3 C
Ratnagiri
Thursday, December 12, 2024
HomeRatnagiriजिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना

जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना

खरीप हंगामातील अधिसूचित पिकांसाठी जोखमीच्या बाबतीमध्ये उद्भवणाऱ्या अनेक अडचणीचा सामना शेतकर्यांना करायला लागू नये यासाठी, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कृषी दिनापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना जनजागृती उपक्रमाचा आरंभ करण्यात आला. नैसर्गिक आपत्ती, पिकांवर पडणारी कीड, बुरशी सारखे रोग त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा फटका बसू नये हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.

भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अमरावती, नांदेड, ठाणे, यवतमाळ, गडचिरोली या सात जिल्ह्यात खरीप हंगाम २०२१ सालासाठी प्रधानमंत्री पीक विमा मोहीम हाती घेतली गेली आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी उपक्रमाचा भाग म्हणून या योजनेसाठी पीक विमा सप्ताह देखील कोकणात सुरू केला गेला आहे.

जिल्हा कृषी अधीक्षक शिवराज घोरपडे यांनी सदर उपक्रमामध्ये विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा, यासाठी जनजागृती करण्याची मोहीम हाती घेतली असल्याची माहिती दिली आहे. प्रत्येक शेतकऱ्याला विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेविषयी जनजागृती करत या सप्ताहात शेतकऱ्यांना अधिकाधिक योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. जनजागृती मोहिमेसाठी लागणारी पत्रके, प्रश्नावलीची पुस्तिका आणि मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशनही अलिकडेच करण्यात आले आहे. तसेच जिथे विमा योजनेचा प्रसार झाला नाही, अशा भागात प्रबोधन केले जाणार आहे.

इफ्को-टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मार्फत हि प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पिकांचे होणारे काढणीच्या आधी नुकसान अशा शेतकर्यांना या विम्याचे संरक्षण दिले जाणार आहे. १५ जुलै २०२१ हि विमा हफ्ता भरण्याची अंतिम तारीख असल्याचे कंपनी मार्फत कळविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular