गणपती बाप्पाच्या आगमनादिवशी पडलेल्या सरींनी बळीराजाला दिलासा मिळाला आहे. कडकडीत उन्हामुळे कातळावरील भात शेती करपण्याची भीती व्यक्त केली जात होती, मात्र पाऊस पडल्यामुळे पिवळ्या पडणाऱ्या रोपांना ताकद मिळणार आहे. सप्टेंबर महिन्यात अखेरच्या टप्प्यात पाऊस पडेल अशी शक्यता होती. त्यानुसार सोमवारी (ता. १८) सरींना सुरवात झाली. मंगळवारी (ता. १९) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. याचवेळी गणपती मूर्ती घरी नेण्यासाठी बाहेर पडलेल्या गणेशभक्तांना सुरक्षित ठिकाणी थांबावे लागले. दुपारनंतर अचानक आभाळ भरून आले आणि सर पडून गेली.
त्यामुळे वातावरणात गारवा होता. अधुनमधून चार दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी पावसाने घेतलेल्या विश्रांतीचा परिणाम भात शेतीवर होत आहे. करप्याचा प्रादुर्भाव वाढण्याची भिती होती. परंतु मंगळवारी दिवसभरात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जूनबरोबर ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर पुन्हा सप्टेंबर महिन्यात पावसाने तिसरा खंड घेतला आहे. या विश्रांतीमुळे जिल्ह्यात गतवर्षाच्या तुलनेत सरासरी ५०० मिमी कमी नोंद झाली आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यानंतर पावसाने ३३०० मिमीची मजल गाठली होती.
यावर्षी पाऊस जेमतेम २८०० मिमीवर थांबला आहे. यावर्षी मोसमी पाऊस विलंबाने दाखल झाल्याने खरीप हंगामात पहिल्याच पेऱ्याला खो घातला होता. त्यामुळे अनेक भागात पेरण्या रखडल्या होत्या. अखेर जून महिन्यात प्रतिक्षा करायला लावणारा मोसमी पाऊस जुलैमध्ये सक्रिय झाला. तोपर्यंत पूर्व मोसमी पावसाने दिलासा दिल्याने पहिला पेरा पार पडला. मात्र लावण्या झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे वाढत्या उन्हाने पिके करपण्याची आणि पिवळी पडण्याची भीती होती. पुन्हा एकदा सप्टेंबर महिन्यात पाऊस सक्रिय झाला, पावसाचे ऐन गणेशोत्वसात आगमन झाले आहे.