सलग दोन दिवस वेगवान वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसाचा जोर सोमवारी (ता. २) ओसरला आहे. वेगवान वाऱ्यामुळे घरावर झाडे पडून तर पावसाचे पाणी घरामध्ये शिरल्यामुळे दापोली तालुक्यात २० लाखांचे, तर रत्नागिरी तालुक्यात सुमारे चार लाखांचे मिळून २४ लाखांचे नुकसान झाले आहे. पंचनामे करण्याचे काम सोमवारी सुरू होते. वेगवान वारे थांबल्यामुळे ठप्प झालेली मासेमारीही पुन्हा सुरू झाली आहे. जिल्ह्यात सोमवारी (ता. २) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासात सरासरी ८८.८९ मिलिमिटर पावसाची नोंद झाली. त्यामध्ये मंडणगड १२०, दापोली ८५, खेड १०७, गुहागर ६५, चिपळूण ६६, संगमेश्वर १५८, रत्नागिरी ८९, लांजा ६५, राजापूर ४५ मिमी नोंद झाली आहे.
१ जूनपासून २ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३१७६ मिमी पाऊस झाला आहे. गतवर्षी याच कालावधीत ३४७४ मिमी पाऊस झाला होता. तुलनेत ३०० मिमी कमी पाऊस झाला आहे. समुद्रात निर्माण झालेल्या वादळी स्थितीमुळे शनिवारी रात्रभर व रविवारी दिवसभर वेगवान वाऱ्यासह पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. जगबुडी नदीने इशारापातळी ओलांडली होती. सर्वाधिक फटका दापोली तालुक्याला बसला. नाले तुंबल्यामुळे केळशी येथे १३ घरांमध्ये पाणी घुसले. त्यात सुमारे २० लाख ३८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
दापोलीतील कोदवली येथे अनंत पवार यांच्या घरावर झाड कोसळून सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाले पावसामुळे दरड कोसळून बंद झालेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी घाटातील आणि मंडणगड येथील म्हाप्रळ घाटातील वाहतूक सुरळीत झाली आहे. रत्नागिरी तालुक्यात उंडी येथे घरावर झाड कोसळल्याने पत्रे फुटून नुकसान झाले. रत्नागिरी तालुक्यात १२ घरा- गोठ्यांचे सुमारे चार तालुक्यांचे नुकसान झाले. त्यामध्ये जांभुळआढ येथे दोन घरांचे नुकसान झाले. थिबा पॅलेस येथे अजित साळवी यांच्या घराचे अर्धे छत कोसळले. लांजा तालुक्यातील वेसुर्ले येथे बंडू शिंदे यांच्या घरावर वडाचे झाड कोसळून सुमारे ८० हजार रुपयांचे, राजापूर अणसुरे येथे घरावर झाड कोसळून नुकसान झाले. पावसाने रविवारी रात्री विश्रांती घेतली. जनजीवन पूर्वपदावर आले आहे.