भारतीय संस्कृतीमध्ये विविध प्रकारच्या दानाचे महत्व सांगितलेलं आहे. अनेक प्रकारची दान करण्याची प्रवृत्ती असणारी माणसे असतात. परंतु, शेवटी व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात ते खोटे नव्हे. आजही रक्तदान करताना सुद्धा माणूस दहावेळा विचार करत असेल. वैद्यकीय सल्ल्यानुसार दर तीन महिन्यांनी रक्तदान करणे शरीरासाठी योग्य असते. आणि आपल्या रक्तदान केल्याने जर एखाद्याचा जीव वाचणार असेल तर याहून उत्तम दान ते कोणत !
प्रत्येकाच्या मनात दानाचे महत्व रुजवून त्यांना रक्तदान, नेत्रदान आणि देहदाना सारख्या अमूल्य दानासाठी जागृत करणे म्हणजे एक प्रकरचे आवाहनच आहे. देहदान किंवा अवयवदान केले तर अनेकांना नविन आनंदी आयुष्याचा उपभोग घेता येऊ शकतो. तसेच मृत्यू नंतरही आपण अजरामर राहू शकतो अशी सकारात्मक भावना ठेवली तर नक्कीच अशा दानांसाठी अनेकजण पुढे येतील.
परंतु काही ठिकाणी असलेला प्राचीन रुढींचा पगडा एवढा असतो कि, मृत व्यक्तीचा अंत्यविधी केला नाही तर संबंधित व्यक्तीचा आत्मा भटकत राहील, त्रास देईल, मोक्ष प्राप्त होणार नाही. शरीरशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्तीच्या शरीराचे संपूर्ण ज्ञान प्राप्त करणे आवश्यक असते. कोणताही आजार नसलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचे देहदान स्वीकारले जाते.
रत्नागिरी मधील संगमेश्वर तळेकांटे येथील सामाजिक कार्यकर्ते संजय भागुराम कांबळे यांचे दि. ५ जुलै रोजी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांनी मरणोत्तर देहदानाचा निर्णय घेतला होता आणि त्याप्रमाणे त्यांनी तो कुटुंबियांना सुद्धा सांगितला होता, त्यानुसार त्यांचा देहदानाचा संकल्प त्यांच्या कुटुंबीयांनी पूर्ण करून समाजासमोर एक प्रकारचा आदर्श निर्माण केला आहे. नेत्रदान आणि देहदान याबद्दल ते नेहमीच अखंड बोलत असत. मात्र, त्यांनी नुसते बोलून नाही, तर ते आपल्या कृतीतून दाखवून दिले. कांबळे यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मरणोत्तर देहदानासाठी सावर्डे येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट संचालित भ.क.ल.वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय डेरवण, ता. चिपळूण येथे देह अर्पण केला.