मुंबई-गोवा महामार्गाची रडकथा अद्यापही कायमच आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी गणेशोत्सवापूर्वी गोवा महामार्गाची पळस्पे (पनवेल) ते सिंधुदुर्ग अशी कोकणात जाणारी एक मार्गिका काँक्रिटीकरणाची करण्याचा चंग बांधला. या कामाच्या. पाठपुराव्याकरिता सहा वेळा गोवा महामार्गाचा पाहणी दौरा केला. काम गतिमान झाले; पण १०० टक्के पूर्ण होऊ शकले नाही, हे वास्तव कोकणात गणेशोत्सवाकरिता गेलेल्या सर्व चाकरमान्यांना प्रवासा दरम्यान लक्षात आले आणि शासनाप्रतिची नाराजी पुन्हा एकदा समोर आली. कशेडी बोगद्याचे काम पूर्ण करून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची हलकी गणेशोत्सवाकरिता जाताना या बोगद्यातून जाण्याकरिता परवानगी देण्यात आली आणि चाकरमान्यांना काहीसा दिलासा मिळाला; परंतु हा दिलासा फारकाळ टिकला नाही.
कारण कोकणातून गणेशोत्सवानंतर परत येणाऱ्या वाहनांकरिता हा बोगदा उपलब्ध नव्हता. परिणामी, वाहतूक कोडीला सर्वत्र सामोरे जावे लागले आणि परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या मार्गीकचे काँक्रिटीकरण झालेले नसल्याने गणेशोत्सवानंतर मुंबईस परतणाऱ्या चाकरमान्यांना या मार्गकिवरील खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागला आणि पुन्हा मनस्ताप वाट्याला आला. वाहतूक कोंडीचे विघ्न देखील कायम होते. अवजड वाहनांना बंदी आणि मोठा पोलिस बंदोबस्त महामार्गावर असतानाही खड्यांमुळे वाहतूक कोंडी ही होतच होती. वाहतूक कोंडी दूर करताना पोलिसांची मोठी दमछाक होत होती. मुळात गोवा-पत्रादेवी ते पळस्पे पनवेल या गावांत राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम आजही अपूर्णावस्थेतच आहे.
गोवा ते पत्रादेवी महामार्गाच्या टप्प्याचे ५ ते ८ किमीचे काम बाकी आहे. पत्रादेवी ते खारेपाटण या ९० किम ीच्या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. खारेपाटण ते राजापूर या टप्प्यातील काम पूर्ण झाले असले, तरी काही ठिकाणी कामे बाकी आहेत. राजापूर ते हातखंबा (रत्नागिरी) या टप्प्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले असले तरी २० टक्के काम अद्याप अपूर्ण आहे. हातखंबा ते चिपळूण या महामार्ग टप्प्याचे ४० टक्केच काम पूर्ण झाले आहे उर्वरित ६० टक्के काम अपूर्ण आहे. या प्रमाणेच चिपळूण ते खेड या टप्प्याचे ३० टक्के काम बाकी आहेत. रायगड जिल्ह्यात पोलादपूर ते इंदापूर या ४५ किमीच्या टप्प्यातील २० टक्के काम अपूर्ण आहे. इंदापूर ते पळस्पे (पनवेल) या टप्प्याचे काम देखील पूर्णपणे बाकी आहे. परिणामी, कोकणातून मुंबईला येणाऱ्या वाहनचालकांचा जीव ‘अगदी मेताकुटीस येत आहे.