मिरकरवाडा येथील अतिक्रमणांवरील कारवाईनंतर या भागात जेटींवरील १५ फुटापर्यंतची जागा मोकळी ठेवण्याचा निर्णय झाला आहे. फिश मार्केटच्या मागील मोकळ्या जागेत मच्छीमारांना विक्रीसाठी सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या बैठकीत यावर निर्णय झाल्याचे मत्स्य विभागाने सांगितले. मिरकरवाडा हे मत्स्य बंदर म्हणून विकसित केले जाणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्याचे काम सुरू होण्यापूर्वी १५ वर्षांपूर्वी तत्कालीन प्रांताधिकारी फरोग मुकादम यांच्या पुढाकाराने येथील शेकडो अतिक्रमणे जमिनदोस्त करण्यात आली होती.
तेव्हाही मोठा पोलिस फौजफाटा घेण्यात आला होता. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होणार आहे. त्यासाठी अपेक्षित निधी उपलब्ध नसल्याने हे काम रखडले आहे. मिरकरवाडा बंदर परिसरातील जागा मत्स्य विभागाची असल्याने या जागेतील अतिक्रमणाचा सव्र्व्हे करण्यात आला होता तेव्हा ३०३ अतिक्रमणे असल्याचे स्पष्ट झाले. या अतिक्रमणामुळे जेटींवर वाहतुकीला प्रंचड अडथळा येत होता. मत्स्य विभागाने ३०३ झोपड्या, टपरी, पक्की बांधकामे आदींना नोटिसा देण्यात आल्या होत्या.
१६ ऑक्टोबरची मुदत संपल्यानंतर पोलिस बंदोबस्तात बंदरातील अतिक्रमणे हटवण्याची कारवाई सुरू केली. याला प्रचंड विरोध झाला; परंतु यंत्रणेने कोणतीही तमा न बाळगता अतिक्रमणे हटवली. त्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी मच्छीमारांची बैठक घेऊन या कारवाईला स्थगिती दिली तसेच मच्छीमारांचे पुनर्वसन करण्याच्यादृष्टीने काही निर्णय घेतले.
फिश मार्केट केंद्र उभारणार – जेटीवरील १५ फुटांचा भाग रिकामा ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे तेथील गर्दी आणि वाहतूककोंडी फुटणार आहे. मच्छीमारांना फिश मार्केटच्या मागच्या बाजूला विक्री केंद्रही उभारून देण्यात येणार आहे. मत्स्य विभागाने याला दुजोरा दिला.