कमी पट संख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून तशो सूचना देखील आयुक्त स्तरावरून देण्यात आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील आशा सुमारे १३०० शाळा बंद होण्याची शक्यता आहे. त्याजागी समूह शाळा सुरू करण्याची संकल्पना राबवण्यात येणार असून त्यासाठी सर्वेक्षण देखील सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांची फार मोठी गैरसोय होणार असून पालकांकडून जोरदार विरोध केला जात आहे. राज्यातील जिल्हापरिषदेच्या अनेक शाळा अल्पपट संख्येत आली आहेत. त्याची माहिती गोळा करण्यात आली आहे.
कमी पट संख्या असल्याने अध्यापनातील शिक्षकवर्ग त्यांचे पगार तसेच इतर सुविधांवर होणारा खर्च असा अतिरिक्त भार सरकारवर पडत असल्याचे निदर्शनास येताच अशा शाळांसाठी सरकारने नवीन धोरण तयार केले असून त्यानुसार २० पेक्षा कमी पट संख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आली असून आयुक्त स्तरावरून तसे सूचना संबंधित जिल्हापरिषद तसेच गटशिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेलादेखील तशो सूचना देण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यानुसार सर्वे क्षण करण्यात येत असून रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे १३०० शाळा २० पेक्षा कमी पट संख्येत आले असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.
त्यामुळे या शाळांवर बंदीची टांगती तलवार राहिली आहे. प्रत्येक तालुक्यात अशा शाळा असून त्याची यादी देखील तयार करण्यात येत असून तसा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार असून पुढील काही दिवसात शासन निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार असल्याने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. २० पेक्षा कमी पट संख्येच्या शाळा बंद करताना त्यातील विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने त्यासाठी सामूहिक शाळा संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी देखील शिक्षण विभागाकडून सर्वेक्षण केले जात आहे. प्राथमिक तत्वावर जिल्ह्यात मंडणगड व दापोली या दोन तालुक्यात सामूहिक शाळा सुरू करण्याच्या हालचाली देखील सुरू करण्यात आल्यो असल्याची माहिती समोर येत आहे.
परंतु सामूहिक शाळा सुरू करताना देखील प्रशासनाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान पालकांनी मात्र सामूहिक शाळा धोरणाला जोरदार आक्षेप घेतला असून ग्रामीण भागातील मुलांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. तसेच मुलांच्या शिक्षणावर देखील त्याचा अनिष्ट परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामीण भागात अगोदरच मोठी पायपीट करत मुले शाळेत येत आहेत. आशा परिस्थितीत स्थानिक शाळा बंद केल्यास सामूहिक शाळा ज्या ठिकाणी सुरू होईल तिथपर्यंत मुलांना चालत किंवा वाहनाने प्रवास करावा लागणार आहे. तसेच अनेक ग्रामीण भागात प्रवासाची व्यवस्था अद्यापही नाही. अशा परिस्थितीत मुलांचे शिक्षण होणार तरी कसे असा प्रश्न पालक उपस्थित करत आहेत.