राजापूरचे आमदार राजन साळवी व त्यांचे बंधू दिपक साळवी यांना पुन्हा एसीबीने चौकशीसाठी २२ जानेवारी रोजी हजर राहण्याचे आदेश दिलेले असतानाच आता जिल्हाभरातून आक्रमक झालेले शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते रत्नागिरीत येऊन धड़कणार आहेत. जिल्हाभरातून ३०० ते ४०० वाहने रत्नागिरीत धडकणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान जिल्ह्यात ठिकठिकाणी आराजन साळवी यांचे समर्थन करणारे बॅनर झळकताना पहायला मिळत आहेत. २ दिवसांपूर्वी आ. राजन साळवी यांच्यासह नातेवाईकांच्या घरांवर एलसीबीने छापे टाकले होते. त्यांच्यासह पत्नी व मुलावर गुन्हे दाखल केले गेले.
यामुळे रत्नागिरीत राजकीय वातावरण तापलेले असतानाच पुन्हा एकदा सोमवार दि. २२ रोजी सकाळी त्यांना व त्यांचे बंधू दीपक साळवी यांना एसीबीने रत्नागिरीतील कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे. या दरम्यान जिल्हाभरातून शिवसैनिकही रत्नागिरीत येऊन दाखल होणार आहें. आ. राजन साळवी यांचा मतदारसंघ असलेल्या राजापूर-लांजा- साखरपा येथून मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाचे शिवसैनिक रत्नागिरीत येणार आहेत. त्याचबरोबर रत्नागिरी-संगमेश्वरसह खेड, चिपळूण येथूनही सुमारे ३०० ते ४०० वाहने भरुन शिवसैनिक रत्नागिरीत धडकणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सर्वत्र संतापाचे सूर उमटत असून शिवसैनिकांनी आपल्या भावना जिल्हाभरात बॅनरच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे वरिष्ठ आमदार गुहागरचे भास्कर जाधव रविवारी सकाळी रत्नागिरीत दाखल होणार आहेत. सकाळी १०.३० वा. ते आ. राजन साळवी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची व कुटुंबियांची भेट घेणार आहेत.