रत्नागिरी मुंबई विद्यापीठ उपकेंद्रांला रत्नागिरीचे सुपुत्र आणि चरित्रकार पद्मभूषण स्व.डॉ. धनंजय कीर यांचे नाव देण्यात यावे यासाठी अनेक स्तरातून मागणी केली जात होती. अखेर तो दिवस उजाडला असून, रत्नागिरीतील मुंबई विद्यापीठाचे नामकरण झाले असून, आजपासून चरित्रकार पद्मभूषण स्व.डॉ. धनंजय कीर उपपरिसर असे नाव देण्यात आले आहे.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता, मुंबई विद्यापीठ उपकेंद्रामध्ये संपन्न झाला आहे. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक अध्यासन अभ्यास आणि संशोधन केंद्राचाही उदघाटन सोहळा संपन्न झाला. प्रमुख अतिथी म्हणून खास.विनायक राऊत यांची उपस्थिती लाभली असून, उदघाटन सोहळा नाम.उदय सामंत यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी नगराध्यक्ष बंड्या साळवी, डॉ. सुमित कीर, दूरदर्शनचे निवृत्त सहा. संचालक जयु भाटकर, मुंबई विद्यापीठ प्रभारी कुलसचिव डॉ. गायकवाड, प्रा. डॉ. राजेंद्रप्रसाद मसुरकर व संबंधित अधिकारी देखील उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या वेळी, प्रा. डॉ. राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा पुस्तक अनावरण सोहळा देखील संपन्न झाला. त्यावेळी ते म्हणाले, लोकमान्य टिळक आणि धनंजय कीर हे दोघेही रत्नागिरीकर. पहिल्या सुपुत्राने भारताला जन्मसिद्ध हक्काचा मंत्र देऊन प्रेरित केले, तर दुसऱ्या सुपुत्राने या महापुरुषाच इंग्रजी चरित्र लिहले, त्यामुळे आजच्या मुहूर्तावर केलेला नामकरण समारंभ म्हणजे दुग्धशर्करा योग म्हणण्यास हरकत नाही.
या सर्व कार्यक्रमामध्ये पाहुण्यांचे स्वागत प्रभारी संचालक प्रा. डॉ. सुखटणकर आणि प्रास्ताविक मुंबई विद्यापीठ प्रभारी कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड यांनी केले. मान्यवरांची भाषणे झाल्यावर कार्यक्रमाची सांगता, आभार प्रदर्शन करून झाली. सदर कार्यक्रम कोरोनाचे शासनाने आखून दिलेल्या निर्बंधांचे पालन करून आणि खबरदारी घेऊन पार पडला.