२२ जुलैला आलेल्या महापुरामुळे चिपळूण, खेड तालुक्यावर विदारक परीस्थिती झाली होती. पूर ओसरल्यानंतर साचलेल्या गाळामुळे सर्वत्र डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पावसाळा आणि त्यामध्ये असणारा हा चिखलगाळ त्यामुळे संसर्गजन्य रोगराई पसरण्याची दाट शक्यता असल्याने, प्रशासन युद्ध पातळीवर स्वच्छता करण्याकडे लक्ष पुरवत आहे.
पूराच्या संकटातून आता कुठे उभे राहत असताना, खेडमध्ये साथीचे आजार वाढण्याचे संकट आले आहे. खेडमध्ये डेंग्युच्या रुग्णांची संख्येमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. पुरामुळे शहरात जागोजागी साचलेले पाणी, गाळ, चिखल यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झाली असून खेड शहर आणि आजुबाजुच्या परिसरात डेंग्युची साथ वेगाने पसरत आहे. नगरपालिका प्रशासनाने पुरानंतर होणारी संभाव्य रोगराई टाळण्यासाठी त्वरेने साफसफाईचे काम हाती घेतले असून, रोगराई पसरू नये यासाठी डास निर्मूलन मोहीम हाती घेण्यासोबत आरोग्य शिबीराचेही आयोजन केले आहे.
मागील दीड वर्षापासून कोरोनाच्या महामारीचा सामना करून जनता हैराण झाली असताना, आता महापुराचा बसलेला फटका जबर होता. महापुराच्या संकटातून बाहेर पडताना आता डेंग्युसारख्या साथीच्या रोगाचे संकट उभे राहिले आहे. खेड शहर व परिसरामध्ये गेल्या चार दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्युसदृश्य रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णालयात येणाऱ्या दहा रुग्णांपैकी दोन रुग्ण कोरोनाचे तर ८ रुग्ण डेंग्यूचे असल्याचे निष्पन्न होत असल्याने झपाट्याने पसरणाऱ्या डेंग्युला आळा घालण्यासाठी वेळीच खबरदारी घेऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे.
आरोग्य विभागाकडून प्राप्त माहितीनुसार सध्या खेड तालुक्यामध्ये १७४ कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत, तर २२ रुग्ण डेंग्युसदृश्य आजाराचे आढळले आहेत. डेंग्युची साथ रोखण्यासाठी आरोग्य विभागाने किटकनाशक फवारणी करण्यास सुरवात केली असून नागरिकांना डेंग्युपासून संरक्षण करण्यासाठी कोणत्या उपाय योजना कराव्यात याबाबत जनजागृती देखील केली जात आहे.