रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे राऊत यांना दहा हजार मताधिक्य मिळाले आहे. रत्नागिरी हा शिवसेनेचा बालेकिल्ला. त्यातील वजनदार नेते शिंदे गटाकडे आल्यामुळे या मतदारसंघातून चांगल्या मताधिक्याची अपेक्षा महायुतीला होती. ग्रामीण भागात शिवसेना तर शहरी भागात भाजपचा बोलबाला असल्यामुळे त्याप्रमाणे प्रचारयंत्रणाही होती. रत्नागिरीमधून राबवली १ लाख ७२ हजार १३९ मतदान झाले होते. त्यात विनायक राऊत यांना ८२ हजारांपेक्षा अधिक मतदान झाले तर महायुतीच्या नारायण राणे यांना ७२ हजारांपेक्षा अधिक मतदान झाले. महायुतीचे राणे विजयी झाले असले तरीही रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात अपेक्षित आघाडी घेता आलेली नाही.
प्रचारावेळी शिंदे शिवसेनेतील अंतर्गत दुही दिसून आली होती. त्यामुळे समन्वयाचा अभाव दिसून आला होता. अंतिम टप्प्यात शिंदे शिवसेनेकडून त्यावर पांघरूण घालण्यात काही प्रमाणात यशही मिळाले होते. दुसरीकडे रत्नागिरीतील ग्रामीण भागामध्ये प्रचारादरम्यान ठाकरे शिवसेनेकडून जोर लावला होता. त्याचा फायदा ठाकरे सेनेला मिळाल्याची चर्चा सुरू आहे. ज्यातील राजकीय घडामोडीनंतर रत्नागिरीचे आमदार उदय सामंत शिंदे शिवसेनेत राहिले. त्यांच्याबरोबर तळागाळातील शिवसेना राहिल्याची अटकळ बांधली जात होती. त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत मिळेल असा अंदाज होता; परंतु प्रत्यक्षात हा अंदाज फोल ठरल्याचे आकडेवारी सांगते.