कोरोना काळामध्ये अनेक दुकाने मागील वर्षभर तरी बंद होतीत. त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग चौथ्या टप्प्यामध्ये अनलॉक झाल्यावर काही प्रमाणामध्ये दुकाने उघडण्यासाठी शिथिलता देण्यात आली होती. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यावर निर्बंधांमध्ये शिथीलता करण्यात आली होती. सध्या सकाळी ९ ते संध्याकाळी ४ या वेळेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी शासनाने दिली आहे.
पुढील महिन्यात गणेशोत्सव असल्याने बाजारपेठा पुन्हा झगमगू लागल्या आहेत. मालवण बाजारपेठ येथील व्यापारी प्रतिनिधींनी बुधवारी मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची भेट घेऊन गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर मालवण बाजार पेठेतील दुकानांच्या वेळा रात्री पर्यत वाढून मिळाव्यात, त्याचप्रमाणे बाजारपेठेत दर सोमवारी भरणारा आठवडा बाजार पुन्हा भरला जावा, अशी मागणी केली आहे. यावेळी व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, अशोक सावंत, नाना पारकर, प्रमोद ओरसकर आदी व्यापारी वर्ग उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हयात सध्याच्या स्थितीत कोरोना बाधित संख्येवरून तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम आहेत. सर्व व्यापारी वर्गाला कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना , आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. याचा विचार करता आगामी गणेशोत्सवाम्ध्ये जास्त वेळ दुकाने उघडी ठेवता आली तर, व्यापारी बांधवाना नक्कीच त्याचा फायदा होईल. दुकाने उघडी ठेवण्याचा कालावधी वाढवून देण्याबाबत तसेच दर सोमवारी भरणारा आठवडा बाजार पुन्हा भरवण्याबाबत, सर्व निकष पडताळून, सर्वांचे विचार लक्षात घेऊन, लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ. व्यापार्यांना सर्व सारासार विचार करून दिलासा देण्यासाठी निश्चितच सकारात्मक भूमिका घेतली जाईल, असे नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी सांगितले.
सोमवारी मालवण शहरात विविध ठिकाणी भाजी, फळे व अन्य व्यापाराच्या निमित्ताने अनेक व्यापारी बाहेरून जिल्ह्यात दाखल होतात. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता बाहेरून येणाऱ्या या व्यापारी वर्गाची पुढील सोमवारपासून ऑन दि स्पॉट कोरोना चाचणी केली जाणार असल्याची माहिती कांदळगावकर यांनी दिली आहे.