रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्तांना लवकरात लवकर मदत स्वरूपातील शासकीय निधी मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. शासनाकडून निधी प्राप्त करण्यासाठी ग्रस्तांकडे सध्या कागदपत्रांची वानवा आहे. काही जणांची कागदपत्रे पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलीत तर काही जणांची पाण्याने भिजून खराब झालीत. त्यामुळे असतील त्या कागदपत्रांवर अथवा त्याची दुसरी प्रत नैसर्गिक अपत्तीग्रस्त लोकांना शासनाकडून करण्यात आलेले पंचनामा प्रत व ई-रजिस्टर उतारा घेऊन रेशन कार्ड व अन्य कागदपत्रांच्या प्रती द्याव्यात, अशी मागणी मानवाधिकार कार्यकर्ते यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे, अशी माहिती श्री किरण तायडे यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहिती देताना श्री तायडे म्हणाले कि, रत्नागिरी जिल्हा येथे आलेल्या पुरामध्ये शासकीय कागदपत्रे गहाळ व खराब झाली आहेत. ही कागदपत्रे दुय्यम प्रतिमध्ये मिळणे खूप आवश्यक आहे. रेशन कार्ड गहाळ झालं असेल तर त्याची दुय्यम प्रत मिळवण्यासाठी, रेशनकार्ड झेरॉक्स, शंभर रुपयाचे प्रतिज्ञापत्र, घरपट्टी, बँक पासबुक, पोलीस स्टेशन दाखला, उत्पन्न दाखला असे कागदपत्रे जमा करावे लागतात, पण नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या लोकांना ही कागदपत्रे गोळा करायला लागू नये व फक्त पंचनामा प्रत व ई-रजिस्टर उतारा इतके कागद घेऊन रेशन कार्ड द्यावेत, अशी मागणी आम्ही केल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मानवाधिकार असोसिएशन ऑफ इंडियातर्फे करण्यात आलेल्या विनंतीद्वारे सुचवण्यात आलेला मार्ग योग्य असून याप्रमाणे सूचना देण्याचे आश्वसन जिल्हाधिकारी यांनी दिल्याचे श्री तायडे यांना सांगितले. यावेळी उबेद परकार, युथ प्रोटेक्शन अध्यक्ष अरबाज बडे आणि सुरेंद्र कापसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. पूर व अन्य नैसर्गिक आपत्तीमध्ये इतर कागदपत्रे दुय्यम प्रति मध्ये देण्यासाठी त्या त्या कार्यालयाना जिल्हाधिकारी यांनी आदेश द्यावेत, अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे.