मुंबई-गोवा महामार्गावरून महायुतीच्या दोन नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, ते योग्य नाही. दोन्ही नेत्यांचे जे काही समज गैरसमज झाले आहेत ते त्यांनी बसून मिटवले पाहिजेत. वरिष्ठांशी बोलून तोडगा काढला पाहिजे. या दोन नेत्यांमधील वाद म्हणजे महाविकास आघाडीला ताकद दिल्यासारखी आहे, अशी स्पष्ट भूमिका शिवसेना नेते व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. रत्नागिरी दौऱ्यावर असलेल्या मंत्री सामंत यांनी महायुतीच्या नेत्यांबाबतच्या वादंगाबाबत छेडले असता ते म्हणाले, “रामदास कदम हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत.
त्यांच्या मतदारसंघामधील कामामुळे रामदास कदम यांचा गैरसमज झाला असेल तर त्यांनी तो चर्चेने सोडवायला पाहिजे होता. त्यांचे सुपुत्र योगेश कदम यांच्या मतदारसंघात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काही अतिरिक्त निधी दिला गेल्याची चर्चा आहे. यावर बोलून चर्चा करून मार्ग काढायला हवा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून हे समज गैरसमज दूर केले पाहिजेत.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आपले सहकारी आणि भाजपचे नेते आहेत. त्यांनीही त्यांच्या विभागामार्फत विकासकामे करण्याचा प्रयत्न केला आहे, हे नाकारता येणार नाही. गतवर्षी त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाची एक लेन पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले आहेत. अनेकवेळा त्यांनी महामार्गावरून यासाठी प्रवास केला आहे. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये वाद होणे हे महाविकास आघाडीला ताकद देण्यासारखे आहे. त्यामुळे रामदास कदम यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून, यातून मार्ग काढावा, अशी भूमिका सामंत यांनी स्पष्ट केली.