स्वीडन व पाकिस्तान या देशांत मंकीपॉक्स बाधित रुग्ण सापडले आहेत. खबरदारी म्हणून नागरिकांनी मंकीपॉक्स या आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या देशातून परत आलेल्या प्रवासी नागरिकांना अशा प्रकारची काही लक्षणे आढळल्यास तत्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे. सध्या देशात या रोगाचा बाधित नसला तरीही काळजी घ्या, असे आवाहन केले आहे. मंकीपॉक्स बाबत नागरिकांनी घाबरून जावू नये. मंकीपॉक्स हा आजार आपल्या देशात किंवा राज्यात आत्तापर्यंत आलेला नाही. जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांना याबाबत वरिष्ठस्तरावरून प्राप्त मार्गदर्शनपर सूचना दिलेल्या आहेत.
मंकीपॉक्स आजार काही प्रकारच्या खारी आणि उंदरामुळे होतो. हे प्राणी या विषाणूचे नैसर्गिक स्रोत आहेत. या आजाराचा कालावधी हा ६ ते १३ दिवस आहे. रुग्णाचा संसर्गजन्य कालावधी हा अंगावर पुरळ उठण्यापूर्वी १ ते २ दिवसांपासून ते त्वचेवरील फोडावरील खपल्या पडेपर्यंत किंवा ते पूर्णपणे मावळेपर्यंत असतो. असा रूग्ण आढळल्यास संशयित मंकीपॉक्स रुग्णाला वेळीच विलगीकरण करावे, रुग्णाच्या कपड्यांची अथवा अंथरुण पांघरुणाशी संपर्क येऊ न देणे, हाताची स्वच्छता ठेवणे, रुग्णांवर उपचार करताना पीपीई किटचा वापर करणे आवश्यक आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.