गुन्हे तर राजरोज घडतच असतात, पण गुन्हेगार सुद्धा विविध प्रकारच्या क्लुप्त्या वापर करून लागले आहेत. सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत प्रत्येक बँक , पोलीस यंत्रणा वेळोवेळी सतर्क करत असते, परंतु, तरीही अनेक जण अशा आमिषाला बळी पडून स्वत:चे आर्थिक नुकसान करून घेतात. आणि मग मदतीसाठी पोलिसांकडे धाव घेतात. रत्नागिरी खेड मधील कोंडिवली गावामध्ये सुद्धा अशीच एक घटना घडली आहे . गावातील एका महिलेला टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रम कौन बनेगा करोडपती मधून तुम्हाला ४० लाखांची लॉटरी लागल्याचे सांगून, सुमारे ८ लाख ७६ हजार ७५० रुपयांची मागणी करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सईदा जमालुद्दीन कटमाले यांनी येथील पोलिस स्थानकात फिर्याद नोंदवली आहे. त्यांची आर्थिक फसवणूक झाली आहे,असे त्यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी अज्ञात आकाश वर्मा विरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
१५ ऑगस्ट रोजी सदर गुन्हेगाराचा फोन संबंधित महिलेला आला. याप्रकरणी खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता आकाश वर्मा नामक व्यक्तीने सदर महिलेच्या मोबाईलवर फोन करून, तुम्हाला ४० लाख रुपयांची लॉटरी लागली असून, ती रक्कम मिळायला हवी असेल तर त्या रकमेचा टॅक्स भरावा लागेल, असे सांगितले. सईदा यांचा त्याच्या गोष्टीवर विश्वास बसल्याने विविध मोबाईलवरून फोन करून टॅक्सची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. त्यानुसार सईदा यांनी काही तासांमध्येच ८ लाख ७६ हजार ७५० रुपयांची रक्कम १६ ऑगस्ट सायंकाळी चार वाजेपर्यंत त्यांनी दिलेल्या अकाऊंट वर भरली. त्याच्याकडून इस्लामी बॅक दुबईच्या बँकेच्या चेकचा, आधार कार्डचा व अन्य आवश्यक कागदपत्र्याचे फोटो घेतले. परंतु पुढे काहीच हालचाल न झाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर, त्यांनी पोलीस स्थानक गाठले आणि सविस्तर तक्रार दाखल केली. रत्नागिरीतील जनतेला पोलिस अनेक वेळा ऑनलाईन फसवणूकीपासून सावध राहण्याचा इशारा देत असतात तरी देखील असे ऑनलाईन फसवणुकीचे प्रकारामध्ये जनता अडकत आहे.