राज्यशासनातर्फे स्थानिक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनस्थळांच्या पुनर्विकासाचे धोरण राबवले जात असून, त्या अंतर्गत राजापूर आणि लांजा तालुक्यातील ११ पर्यटनस्थळांच्या विकासासाठी ३ कोटींचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती भाजपच्या विधानसभा क्षेत्राध्यक्षा राजश्री विश्वासराव यांनी दिली. हा निधी राज्याचे ग्रामविकास गिरीष महाजन यांनी मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले. राजापूर विधानसभा मतदार संघातील पर्यटनस्थळांचा पुनर्विकास व्हावा यासाठी नागरिकांकडून सातत्याने मागणी केली जात होती. पर्यटनस्थळांच्या ठिकाणी आवश्यक त्या सोयीसुविधांची उभारणी झाली तर तिथे रोजगार निर्मिती होऊ शकेल, असे नागरिकांचे मत होते.
त्यासाठी शासनाने निधी द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. त्यामुळे ११ पर्यटनस्थळांसाठी ३ कोटी निधी मंजूर झाला, असे विश्वासराव यांनी सांगितले. शासनाने मंजूर केलेल्या निधीतून लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली येथील श्री बल्लाळ गणेशमंदिराच्या परिसर विकास व सुशोभीकरणाला २५ लाख, कोट येथील झाशीची राणी लक्ष्मीबाई स्मारकाजवळील मूलभूत सुविधांसाठी ५० लाख.
कुवे येथील गणेशमंदिरात पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा उभारणीला ३० लाख, साटवली येथील शिवकालीन गढीवर मूलभूत सुविधांची उभारणी २५ लाख, राजापुरातील कशेळी येथील श्री कनकादित्य मंदिराचे सुशोभीकरण करणे २५ लाख, रायपाटण येथील दत्त दासांचे स्वामी महादेवनंदजी दत्तमंदिर येथील सुशोभीकरण व मूलभूत सुविधा उभारणे २५ लाख, अणसुरे येथील श्री गिरेश्वर मंदिर विकासकामांसाठी २० लाख, आडिवरे येथील श्री महाकाली मंदिर विकासकामांसाठी २५ लाख, आंबोळगडावर पर्यटन सोयीसुविधा उभारणी करण्यासाठी २५ लाख, यशवंतगडावरील विकासकामांसाठी २५ लाख, सागवे कात्रादेवी परिसर विकासासाठी २५ लाख निधी मंजूर केलेला आहे, असे विश्वासराव यांनी सांगितले.
पर्यटन व्यावसायाला चालना – राजापूर-लांजा तालुक्यात विविध ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटनस्थळे आहेत. तिथे दरवर्षी काही प्रमाणात पर्यटक भेटी देत असतात. मात्र, पायाभूत सोयीसुविधांच्या अभावामुळे पर्यटकांचा राबता कमी आहे. शासनाने निधी दिल्यामुळे पर्यटनस्थळांचा पुनर्विकास होईल आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे. त्याचबरोबर पर्यटन व्यवसायातून रोजगार निर्मितीही होईल.