केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रे दरम्यान ओढवलेल्या हिंस्रक वळणाची चर्चा अजूनही सर्वत्र सुरु आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांची केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी पोलीस बळाचा वापर करण्याचा आदेश देणारी व्हिडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली असून, त्या क्लिपची तसेच रत्नागिरी पोलीस अधीक्षकांची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपने केंद्र सरकारकडे केली असल्याची माहिती भाजपचे प्रदेश सचिव प्रमोद जठार यांनी दिली आहे.
जिल्हा भाजप कार्यालयात काल झालेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार प्रमोद जठार यांनी पालकमंत्र्यांचा घात त्यांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला बसलेल्यांनीच केल्याचा घणाघाती आरोप केला आहे. या डाव्या-उजव्या ठिकाणी बसलेल्यांना माईक सुरू असल्याचे माहीत असूनसुद्धा त्यांनी ते जाणवू दिले नाही, कारण या दोघांनाही परबांचा काटा काढायचा होता. त्यांनी आपला सूड उगवला, असा टोला जठार यांनी लगावला. याचप्रमाणे जठार यांनी रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या राणेंच्या अटकेच्या कामाबद्दलही तीव्र आक्षेप घेतला आहे. शिवसेनेच्या शाखाप्रमुखाप्रमाणे ते वागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रत्नागिरीमध्ये अनेक ठिकाणी पोलिसांच्या देखरेखीखाली पोस्टर्स फाडली जात होती, पण पोलिसांनी त्यावर काहीच कारवाई केली नाही.
रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक तालिबान्यांप्रमाणे वागत होते, असा गंभीर आरोपही त्यांनी लावला आहे. आणि आम्ही अटकेला घाबरत नव्हतो. पोलिसांनी अटक करावी हे आमचे आव्हानच होते. सरकारचे जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करण्याचे काम आहे. जनआशीर्वाद यात्रेच्या दिवशी जिल्हा नियोजन समितीची बैठक लावून त्यांना भाजपसाठी खड्डा खणायचा होता, मात्र ते स्वतःच त्या खड्ड्यात पडले असे न म्हणता, अनिल परब यांच्याच दोन्ही सहकाऱ्यांनी त्यांना खड्ड्यात ढकलले. त्याचे परिणाम त्यांना भविष्यात भोगावेच लागतील, असेही त्यांनी म्हटले आहे.
जन आशीर्वाद यात्रे दरम्यान झालेल्या सर्व प्रकाराची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रीय मंत्री राणे यांची चौकशी करण्यासाठी फोन केला असल्याची सुद्धा माहिती दिली.