कोरोना काळामध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांची गरज किती मोठी आहे, हे दाखवून दिले आहे. आरोग्य खात्याने देखील मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कर्मचाऱ्याच्या भरतीची घोषणा केली आहे. डॉक्टर, नर्सेस, इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानेच कोरोनावर काही प्रमाणात मात करणे शक्य झाले आहे.
मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली, महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस वैद्यकीय संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसचिव देसाई यांसह वैद्यकीय शिक्षण विभागाचे संबंधित अधिकारी आणि मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या एएनएम आणि जीएनएम या अभ्यासक्रमांसाठी यंदा सीईटी परीक्षा घेण्यात येणार नसल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. पूर्वी एएनएम आणि जीएनएमच्या प्रवेशप्रक्रिया या सीईटीच्या मुल्यांकनावर आधारीत असायच्या. मात्र या वर्षापासून या अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्रक्रिया ही बारावीच्या मुल्यांकनावर आधारीत करण्यात आली आहे.
कोविडसारख्या महामारीच्या काळात देशासह राज्याला स्वत:च्या जीवाची परवा न करता, वैद्यकीय डॉक्टर यांच्याबरोबरच नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, आरोग्य कर्मचारी यांचे महत्व अनन्यसाधारण आहे. पहिल्या लाटेमध्ये तर लसीची काहीच उपलब्धता नसल्याने, दुसर्या लाटेमध्ये मृत्यूच्या आकड्यामध्ये घाट होण्यास सुरुवात झाली. येत्या काळात शासकीय आणि खाजगी रुग्णालयात सेवा देणाऱ्या परिचारिकांना किमान समान वेतन मिळते आहे का याबाबतची पाहणीही महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळाने करणे गरजेचे असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.