सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचे वारे वाहू लागले आहेत, अनेक चाकरमानी गावाला येण्यासाठी तयारीत आहेत. मात्र शासनाने अचानकच कोरोना चाचणी बंधनकारक केल्याने, सर्वांचाच हिरमोड झालेला दिसून येत आहे. परंतु अशाही परिस्थितीचा फायदा घेणारे सुद्धा काही जण असतात. काही जण चाचणी करून घ्यायला घाबरत असल्याने, गावी जायचे कसे हे नवीनच संकट समोर उभे ठाकले आहे. तर काही जण लोकल प्रवासासाठी बेकायदेशीर मार्गाने पास मिळविण्यासाठी धडपडत आहेत.
मुंबईमध्ये कोरोना RTPCR चाचणीचे बनावट सर्टिफिकेट तयार करुन विकणाऱ्या एका सायबर कॅफे चालकाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या सायबर कॅफे ऑपरेटरला पोलिसांनी दक्षिण मुंबईतून ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्याच्या कॅफेमधील संगणक आणि प्रिंटर देखील जप्त करण्यात आले आहेत.
सदरचा आरोपी कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं खोटं सर्टिफिकेट बनवून देत असत. मुंबई क्राईम ब्रान्चला अशी खबर मिळाली कि, अशी एक व्यक्ती दक्षिण मुंबईत सायबर कॅफे चालवत आहे. या सायबर कॅफेमध्ये बनावट आरटीपीसीआर सर्टिफिकेट बनवून देऊन, लोकांकडून त्याबदल्यात जादाचे पैसे उकळले जात आहेत. या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या सायबर कॅफे चालकाला रंगे हात पकडण्याच बेत आखला. यासाठी मुंबई क्राईम ब्रान्चचे अधिकारी बोगस ग्राहक बनून त्याच्या सायबरला मध्ये गेले आणि त्याच्याकडून बनावट आरटीपीसीआर सर्टिफिकेटची मागणी केली. त्यानंतर त्या व्यक्तीने कोणत्याही तपासणी शिवाय RTPCR चा अहवाल केवळ १० मिनिटात बनवून त्यांना दिला. त्यानंतर काही वेळातची पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अशा बोगस कागदपत्र विक्रीचे काळे धंदे सर्हास सुरु असतात. मुंबईमध्ये असे बरेच लोक आहेत ज्यांनी कोरोना प्रतिबंधित लसीचे दोन डोस घेतले नाहीत, मात्र लोकलमध्ये प्रवास करण्यासाठी आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह रिपोर्ट असावा लागतो किंवा दोन्ही लसीकरण पूर्ण झालेले असावे लागते. त्यामुळे लोकलचा पास मिळवण्यासाठी जादाचे पैसे खर्चून असे बोगस आरटीपीसीआर रिपोर्ट तयार करुन घेत आहेत.