कोकणात वानर, माकडे व बिबट्या, गवा जंगल सोडून मानवीवस्तीत वावर करू लागल्यामुळे शेतकरी व आंबा बागायतदार हतबल झाले आहेत. राजापूर तालुक्यातील भालावली परिसरात कित्येक एकरात आंबा, काजू लागवडीची गव्याकडून मोठ्या प्रमाणात नासधूस केल्याचे उदाहरण आहे. तसेच संगमेश्वर, लांजा आणि रत्नागिरी तालुक्याचा काही – भागात गव्यांच्या कळपांचे वास्तव्य आहे. याबाबत वनविभागाने गव्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे. गवा प्रामुख्याने दोडामार्ग जंगलात मोठ्या प्रमाणात वावरत आहे. गेले तीन- चार वर्षे राजापूर तालुक्यातील भालावली परिसरात गव्यांचा वावर वाढू लागला आहे. सुरुवातीला दोनच. गवे आढळून आलेले होते. आता त्यांची संख्या वाढून परिसरामध्ये आठ ते दहा कळपात झाली आहे. भालावली गाव १२ वाड्यांचा असून तेथील लोकसंख्या सुमारे १२०० ते १४०० आहे. या गावातील शेतकरी, बागायतदारांनी आंबा, काजू, नारळ यांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. परंतु गव्यांच्या उपद्रवाने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
त्यांना पळवण्यासाठी अनेक उपाय करण्यात आले. मात्र, त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. आठ ते दहा फूट उंचीच्या झाडांवरील हिरवा पाला, मोहोराची गव्यांच्या कळपाकडून नासधूस होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. हे गवे मोठे असून मोठी झाडे सहज उद्ध्वस्त करून टाकतात. या संदर्भात वनविभागाकडे तक्रार करण्यात आली. परंतु, त्यांचा बंदोबस्त करण्याबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. यावर कार्यवाही न झाल्यास भविष्यात येथील बागायती शिल्लक राहणार नाही. बागायतीसोबतच भातशेतीचेही गवे नुकसान करत असल्याने शेतकऱ्यांचे दोन्ही बाजूने नुकसान होत आहे. हीच परिस्थिती संगमेश्वर, लांजा, गुहागर या तालुक्यातही निर्माण झालेली आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे जिल्हास्तरावर गांभीर्याने पाहावे, असे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.
आंबा, काजू लागवडीवर परिणाम – आमची सुमारे ४० ते ५० एकर परिसरामध्ये आंबा, काजू लागवड करण्यात आली आहे. परंतु गेले तीन-चार वर्षे गव्यांचा कळप दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा त्रास बागायतदारांना होत आहे. त्यांच्या उंचीच्या कक्षेत येणाऱ्या झाडांची पालवी, मोहोर तोडतात. झाडेही तोडून टाकतात. त्यांचा वावर या परिसरात वाढत असल्यामुळे कोणतीही उपाययोजना केली तरी ते येथून जात नाहीत. त्यांचा उपद्रव कमी करणे अवघड झाले आहे, असे आंबा बागायतदार जयेश विश्वासराव यांनी सांगितले.