तालुक्याची आर्थिक राजधानी असलेल्या शृंगारतळीच्या वेशीवर पुन्हा कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. यापूर्वी टाकलेल्या कचऱ्याची विल्हेवाट पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने लावून ध्वनीक्षेपाद्वारे जनजागृती करून सुद्धा वेशीवर कचरा आणून टाकला जात आहे. मॉर्निंगवॉकचेनिमित्त साधून हा कचरा काही सुशिक्षित नागरिकांकडूनच टाकला जात असल्याची चर्चा असून ग्रामपंचायतीच्या स्वच्छता जनजागृतीला त्यांच्याकडून ठेंगा दाखवण्यात येत असल्याचे चित्र आहे. घनकचरा व्यवस्थापनामध्ये जिल्हास्तरावरून नीला पॉलिकॅप व ऑल इंडिया या दोन कंपन्यांना ठेका देण्यात आला आहे. प्रत्येक गावाचा घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत डीपीआर तयार करून सार्वजनिक शोषखड्डे, वैयक्तीक शोषखड्डे, सार्वजनिक कुंड्या, कचरा संकलन, इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या सायकलही दिली आहे.
पोस्टर व बॅनरबाजीने स्वच्छतेचा संदेश दिला जात आहे. स्पीकरवरून कचरा उघड्यावर टाकू नये, कारवाई केली जाईल, असा संदेशही निरूपयोगी ठरत आहे. पाटपन्हाळे गावच्या शृंगारतळी हद्दीत कचरा जमा करणारी घंटागाडी रोज फिरत असते. कित्येक नागरिक हातात कचरापेटी घेऊन घंटागाडीत कचरा टाकण्यासाठी रस्त्यावर उभे असतात आणि कचरा घंटगाडीत टाकतात. त्याच हद्दीत जानवळे फाटादरम्यान, रस्त्यालगत कचऱ्याचे ढीग कसे काय तयार होतात ? हा संशोधनाचा विषय ठरला आहे.
जणू कचऱ्याचे डेपो – प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गावपातळीवर कचराकुंड्यांचेही वाटप ग्रामपंचायतीकडून केले जाते. आपल्या घरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नागरिकांची. मात्र, काहीजण कचऱ्याने भरलेली पिशवी रस्त्याच्या कडेला किंवा नदीनाल्यांमध्ये टाकतात. बहुसंख्य ग्रामपंचायतींकडे बाजारपेठांमधील कचरा संकलित करण्याचा विषय येत नाही. मात्र भाजीव्यापारी, मासळी, मटणविक्रेते दिवसभराची घाण आणून गावच्या वेशीवर रस्त्यालगतच टाकतात. काही ठिकाणे कचऱ्याचे डेपोच बनले आहे.
नाक्यांवरील पिंजरे कचऱ्याने तुंबलेले – कचरा टाकण्यासाठी तारेचे पिंजरे मुख्य नाका, बाजारपेठेत ठेवले आहेत. ते भरून ओसंडून वाहात आहेत. पिंजऱ्यांमध्ये प्लास्टिक बाटल्या, पाकिटे यांचा कचरा बाहेर काढलेला नसल्याचे लक्षात येते. कित्येक पिंजऱ्यांना झाडांच्या वेली, वाळवीने घेरलेले असते. सदर कचरा संकलनाची जबाबदारीही एका एजन्सीकडे दिली आहे.