जिल्ह्यातील रिक्त झालेल्या १४८ महा ई-सेवा केंद्र सुरू करण्यासाठी इच्छुकांनी माहिती तंत्रज्ञान विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावे, असे उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी सांगितले. अर्ज ९ ते १७ डिसेंबर अथवा या कालावधीत कार्यालयात किंवा ditratnagiri@gmail.com यावर अर्ज स्वीकारले जातील. महा ई-सेवा केंद्र चालवण्याबाबत अटी व शर्ती आहेत. त्यात केंद्र मंजूर ठिकाणीच चालवण्यात यावे अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार महा ई-सेवा केंद्र चालू ठेवून नागरिकांना सेवा पुरवणे, शासनाने ठरवून दिलेल्या ब्रँडिंगचा वापर करणे तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाने स्थापन केलेल्या हेल्पलाईन क्रमांकाचा तपशील आपले सरकार सेवाकेंद्राच्या दर्शनी भागावर प्रसिद्ध करणे. ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक शुल्काची आकारणी करू नये, दरपत्रके दर्शनी भागावर प्रसिद्ध करणे, ग्रामपंचायत क्षेत्रात महा ई-सेवा केंद्राची संख्या कमी असल्यास त्या ग्रामपंचायत क्षेत्रात किंवा नागरी क्षेत्रात, प्रभागात सीएससी-एसपीव्हीकडे ऑनलाईन नोंदणीकृत सीएससी केंद्रे महा ई-सेवाकेंद्राचा दर्जा प्राप्त करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करू शकतात.
केंद्रामध्ये अर्ज करणारा नागरिक हा त्या गावातील रहिवासी असावा. जर त्या गावातील नागरिकांचा अर्ज आला नसेल तर जवळच्या गावातील रहिवासी असलेल्या अर्जाचा विचार करण्यात येईल. अर्ज सादर करताना अर्जदाराने सर्व आवश्यक कागदपत्राच्या छायांकित प्रती अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील. त्यानंतर अर्जदाराकडून कोणतीही कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. एका कुटुंबातील फक्त एकच व्यक्ती महा ई-सेवाकेंद्रासाठी अर्ज करू शकते. त्यांच्या कुटुंबातील दुसरा अर्ज प्राप्त झाल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही. अर्जामध्ये माहिती चुकीची आढळल्यास अर्ज रद्द करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आपले महा ई-सेवा केंद्रांना शासनाने तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वेळोवेळी देण्यात येणाऱ्या निर्देशांचे पालन करावे लागेल तसेच उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे पालन करावे. लागेल. प्रस्तावित महा ई-सेवाकेंद्राच्या गावात केंद्र देण्याबाबतचे किंवा केंद्र रद्द करण्याबाबतचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा सेतू समिती यांनी राखून ठेवले आहेत. एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास योग्य पर्यायाच्या आधारे उमेदवाराची निवड करण्याचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत.
अर्जासोबत ही कागदपत्रे सादर करा – अर्ज करताना त्यासोबत आधार कार्ड, पॅनकार्ड, संगणकीय प्रमाणपत्र (MSCIT/Equivalent), शैक्षणिक अर्हता १२ किंवा समकक्ष व त्यापुढील, CSC धारक असल्यास त्या संबंधित प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र (असल्यास) सादर करावयाची आहेत.