रत्नागिरी जिल्ह्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे दापोली शहर चांगलेच गारठले आहे. १६ डिसेंबर सकाळी ८ वाजल्यापासून ते १७ डिसेंबर सकाळी ८ वाजेपर्यंतच्या कालावधीत किमान तापमान ७.८ अंश सेल्सिअस, तर कमाल ३१.९ अं. से. इतकी नोंद कोकण कृषी विद्यापीठाच्या गिम्हवणे येथील हवामान केंद्रावर झाली. या वर्षातील ही सर्वात निच्चांकी नोंद आहे. दापोली शहर हे समुद्रसपाटीपासून २५० मीटर उंचीवर वसलेले वैशिष्ट्यपूर्ण शहर आहे. एवढ्या उंचीवर असूनही अवघ्या ७ ते ८ किलोमिटरवर समुद्रकिनारा आहे. ११ डिसेंबरपासून दापोलीत पारा घसरू लागला आहे. मंगळवारी सकाळी सर्वात कमी नोंद झाली आहे. यापूर्वी २ जानेवारी १९९१ मध्ये दापोलीत आतापर्यंतची सर्वात नीचांकी नोंद ३.४ अं.से. इतके झाली होती. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ३ जानेवारी १९९१ ला ते ३.७ अं.से. तापमान होते. त्यानंतर तब्बल अठरा वर्षानंतर म्हणजेच ९ फेब्रुवारी २०१९ ला किमान तापमान हे ४.५ अं.से. इतके कमी राहिले होते. तापमानाची एवढी निच्चांकी नोंद जिल्ह्यात झाली होती.
गेल्या थंडीच्या हंगामात ७ मार्च २०२३ ला किमान तापमान ८.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. थंडीचा हंगाम खरा ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत असतो; परंतु गेल्या वर्षी सुरवातीला थंडीच नव्हती. दोन महिन्यांनी अचानक वातावरणात बदल झाला. पुढे हंगामात तीनवेळा पारा खाली आला. त्यामुळे उशिरा थंडी सुरू झाली. यावर्षी तुलनेत थंडीचा हंगाम वेळेत सुरू झाला असून ३० नोव्हेंबरला पारा ८.८ अंशावर आला होता. तेरा दिवसांनी तापमानात बदल झाला असून ७.८ अंश सेल्सिअस एवढा पारा खाली घसरला आहे. डिसेंबर महिन्यात एवढा कमी पारा खाली आल्याची ही पहिलीच नोंद आहे. तसेच चार वर्षानंतर किमान पारा खाली घसरला आहे. त्यामुळे दापोलीकरांना बोचऱ्या थंडीला सामोरे जावे लागत आहे. हुडहुडीमुळे नागरिकांसह पर्यटकही शेकोट्या पेटवून बसत आहेत. उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतरांगांमध्ये जोरदार बर्फवृष्टीला सुरू झाली असून, त्या दिशेने येणाऱ्या शीतलहरींमुळे संपूर्ण महाराष्ट्र गारठला आहे. त्याचाच परिणाम -दापोलीत जाणवत असल्याचे हवामान विधाने मत आहे.