25.6 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

सुनावणीपूर्वीच फेरसर्वेक्षणाला विरोध – शिवसेना ठाकरे गट

चिपळूण पालिकेने वाढीव घरपट्टीबाबत २८ सप्टेंबरपर्यंत हरकती...

ना. नितेश राणेंना मत्स्योद्योग तर गोगावलेंना रोजगार हमी मंत्रालय

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजताच शनिवारी रात्री...

प्राध्यापकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ गुहागरात निघाला मोर्चा…

गुहागर येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयातील ३ प्राध्यापकांना झालेल्या...
HomeRatnagiriनवीन वर्षात प्रवाशांना भाडेवाढीचा धक्का बसणार…

नवीन वर्षात प्रवाशांना भाडेवाढीचा धक्का बसणार…

माहिती राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

एसटी महामंडळाचा चेहरामोहरा बदलला जात आहे. नवीन गाड्या येत आहेत. कर्मचाऱ्यांची नुकतीच ६ हजार ५०० रुपयाची वेतनवाढ केली आहे. हा संपूर्ण खर्च काढायचा असल्यास निधी येणार कुठून ? मागील ३ वर्षे दरवाढ करण्यात आली नाही. एकंदरीत सर्व बाबी लक्षात घेता, एसटीची १४.९५ टक्के दरवाढ करण्याचे नियोजन आहे. यासंदर्भात नुकतीच बैठक झाली असून सर्वसंमतीने याबाबत निर्णय घेऊन शासनाला दरवाढीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याची माहिती राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी पत्रकार परिषदेत दिली. गोगावले म्हणाले, गोरगरिबांची ‘लालपरी’ म्हणून एसटीची ओळख आहे. सध्या बसची संख्या फार अपुरी आहे. नवीन वर्षात तीन ते साडेतीन हजार नवीन बस आणण्याचा प्रयत्न आहे.

यात अशोक लेलँड कंपनीला २,२०० बसची ऑर्डर देण्यात आली आहे. लवकरच त्या महामंडळाच्या ताफ्यात दाखल होतील. त्यातच आणखी १,३१० गाड्या भाडेतत्वावर घेणार असून ५ हजार १५० इलेक्ट्रिक बस टप्प्याटप्प्याने दाखल होत आहे. त्यातच जुन्या बस भंगारात काढल्या जातील. महामंडळाला वेगळेपण आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात आणखी काय सुधारणा करता येऊ शकते, याची चाचपणी सुरू आहे. प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा कशा देता येतील, याबाबतही नियोजन सुरू आहे.” असे त्यांनी सांगितले. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मद्यपी चालकाला माफी नाही – एसटीच्या वाढत्या अपघातावर गोगावले म्हणाले, “चालकाच्या हातात ५० प्रवाशांचा जीव असतो. चालक मद्य प्राशन करून वाहन चालवितात, अशा तकारी प्राप्त झाल्या आहेत. बैठकीत आम्ही निर्णय घेतला असून अशा प्रकरणात चालकाची अजिबात हयगय करणार नाही. त्याला माफी नाही. चालकाने मद्य प्राशन केल्याचे प्रवाशांच्या लक्षात आल्यास तत्काळ बस थांबून त्यांनी उतरून जावे, पोलिस किंवा महामंडळाला कळवावे. अशा चालकाचे काय करायचे, ही पुढे आमची जबाबदारी आहे. वाहन चालवीत असताना कानात हेडफोन लावण्यासारखे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत.”

बस लोकेशन अॅप लवकरच – “एसटी बस नेमकी कोणत्या मार्गावर आहे. ती कुठपर्यंत पोचली याबाबत बसच्या लोकेशनची मोबाईल अॅपच्या माध्यमातून माहिती मिळत नाही. यावर गोगावले म्हणाले, येत्या दोन महिन्यात ही संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. स्वच्छ बस स्थानकाकरिता एसटीचे कर्मचाऱ्यांसोबतच बीओटी तत्त्वावरील कंपन्यांची मदत घेतली जाईल,” असेही गोगावले यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

Most Popular