24.8 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मंत्री उदय सामंतांचे उद्या होणार जंगी स्वागत…

मंत्री उदय सामंत यांचे रविवारी (ता. २२)...

गुहागरमध्ये मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून २५ जण भाजले

मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून रेडिएटरमधील उकळते, हिरवे...

कुंभार्ली घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करा – आमदार शेखर निकम

कुंभार्ली घाटमार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण, पशुसंवर्धन योजनांसाठी संमतीपत्राची...
HomeRatnagiriसंतप्त ग्रामस्थ जिंदालच्या गेटवर धडकले, कंपनीवाल्यांची तंतरली!

संतप्त ग्रामस्थ जिंदालच्या गेटवर धडकले, कंपनीवाल्यांची तंतरली!

१२५ पेक्षाही अधिक विद्यार्थी व ग्रामस्थ वायूबाधित होऊन हॉस्पिटलमध्ये दाखल.

जिंदाल कंपनीचे मोठ्या प्रमाणावर वायू गळती झाल्याने १००-१२५ पेक्षाही अधिक विद्यार्थी व ग्रामस्थांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले व जिंदालवरुन प्रचंड जनक्षोभ निर्माण झाला.

संतप्त ग्रामस्थांचे आंदोलन – आज दुपारपासून परिसरातील संतप्त ग्रामस्थ जिंदालच्या गेटवर जमा होऊ लागले होते. हा हा म्हणता शेकडोंचा जमाव जमा झाला आणि मग ‘जिंदाल कंपनी बंद करा’ अशा घोषणा सुरु झाल्या. हे होताच आजवर मयूरीत वागणारे जिंदालचे बडे ‘हाफिसर’ भानावर आले… त्यांची तंतरली… त्यांनीत्वरित पोलिसांना पाचारण केले… पोलीस फौजफाटा प्रचंड मोठ्या संख्येने लगोलग येऊन दाखल झाला. संतप्त ग्रामस्थ गेट तोडून कंपनीच्या आवारात जाऊ पहात होते.. त्यांना अडविण्यात आले व परतवण्यात आले.

जिंदालवाल्यांची फेऽ फेऽ – ही जिंदाल कंपनी सुरु होताना खुद्द रत्नागिरीत ‘जनसुनावणी’ झाली. त्यावेळी ‘रत्नागिरी बचाव संघर्ष समिती’चे नेते व मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. त्यांनी एका मागोमाग एक असे मुद्दे उपस्थित केले की कंपनीच्या मुखियांची बोलती बंद झाली. या प्रकल्पामुळे जयगड, रत्नागिरीच्या समुद्रातील मत्स्य जीवन तसेच वनस्पती जीवन, प्राणी जीवन, शेतीभाती, बागायती, पर्यावरण व जनजीवन यावर कोणते विपरीत परिणाम होतील ते प्रथम सांगा आणि मगच परवानगीचे बोला असे त्यावेळी संघर्ष समितीच्या मंडळींनी सुनावले आणि जिंदालवाल्यांची फे फे उडाली.

हा आहे कंपनीचा इतिहास! – जनसुनावणीच्या अगोदर १ महिना कायद्याप्रमाणे परिसरातील ग्रामपंचायती, विविध संस्था, पर्यावरण अभ्यासक, पोलीस पाटील, पोलीस स्पेशल अशा सर्व सार्वजनिक ठिकाणी ‘Environmental Impact Assessment Report’ जनतेला पाहण्यासाठी ठेवावा लागतो. एवढेच नव्हे तर स्थानिक भाषेत म्हणजे मराठीत केलेले त्याचे भाषांतरही सर्वांना उपलब्ध करुन द्यावे लागते. परंतु जिंदालने या सर्व बाबींची पूर्तता न करता रेटून ‘जनसुनावणी’ घेतली. संघर्ष समितीच्या नेत्यांनी कणखरपणे आक्षेप घेतल्यावर जिंदालला ‘झक मारत’ जनसुनावणी रद्द करावी लागली हा या कंपनीचा इतिहास आहे.

जणू पाटलोण उतरविली – संघर्ष समितीचे त्यावेळी अध्यक्ष होते अॅड. कै. केतन घाग, उपाध्यक्ष आमदार कै. शिवाजीराव गोताड, जन. सेक्रेटरी श्री. सुधाकरराव सावंत आदी पदाधिकारी होते. त्यावेळी नगराध्यक्ष कै. रविंद्र सुर्वे, कै. मोहनराव इंदुलकर, माजी आमदार श्री. राजन साळवी, श्री. कुमार शेट्ये असे कणखर नेते होते… ते कुणाची भीडभाड बाळगणारे नव्हते… लोचटपणे कंपनीकडून मिळणाऱ्या कॉन्ट्रॅक्टसाठी हपापलेले नव्हते. तसेच संघर्ष समिती सोबत जागतिक किर्तीचे पर्यावरण तज्ज्ञ डॉ. रश्मी मयूर, डॉ. कै. रविंद्र बिर्जे, डॉ. कै. प्रमोद कोकाटे असे दिग्गज पर्यावरण तज्ज्ञ होते… त्या सर्वांनी जणू कंपनीवाल्यांची ‘पाटलोण’ उतरवून ठेवली आणि मग ‘जनसुनावणी’ रद्द करावी लागली.

जयगडचे ग्रामस्थ बहाद्दूर – त्यानंतर जिंदालने मोठ्या हुशारीने जयगडच्या गावाबाहेरील पठारावर गाजावाजा न करता पुन्हा जनसुनावणी आयोजित केली आणि आपल्याला हवे तसे करुन घेतले. जयगड येथील ग्रामस्थ ‘बहाद्दूर’ म्हणून ओळखले जातात. जिंदाल येथे होणारा फिनोलेक्स कंपनीचा तसेच दुसऱ्या एका मल्टीनॅशनल कंपनीचा पेट्रोकेमिकल ‘प्रकल्प जिंदाल परिसरातील ग्रामस्थांनी पिटाळून लावला होता. परंतु त्यांना गाफील ठेवून ‘मोका’ साधला गेला. त्यावेळी कणखर बाण्याचे व जनहितदक्ष नेते होते… आताच्या पुढाऱ्यांबद्दल काय बोलावे?… सुमारे १२५ पेक्षाही अधिक विद्यार्थी व ग्रामस्थ वायूबाधित होऊन हॉस्पिटलमध्ये दाखल झाले तरीही आताचे पुढारी मूग गिळून घरी बसले आहेत… यातच सारे स्पष्ट होते.

संतप्त ग्रामस्थ एकवटले – जयगड दशक्रोशीतील ग्रामस्थ भले गरीब असले तरी स्वाभिमानी आहेत… ते कुणाचीही मिजास कदापीही सहन करुन घेणारे नव्हेत… कुणीही पुढारी ‘हयात’ नसला तरी शेकडोंच्या संख्येने आज ग्रामस्थ एकवटले आणि त्यांनी कंपनीचा धिक्कार केला. प्रशासनाने स्थगितीची कारवाई करणे अपेक्षित होते, आजवरचा तो रिवाज आहे, परंतु थातुरमातूर मलमपट्टी करण्याचा व जनतेची समजूत घालण्याचा प्रकार झाला हे दुर्दैव होय अशी संतप्त भावना अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली… अखेर गरीबांना कुणी वाली नसतो हेच खरे!

RELATED ARTICLES

Most Popular