आज जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण यांनी वाईट प्रवृत्ती, अनिष्टांचे निर्दालन केले. जन्माष्टमी उत्सवातून आपण प्रेरणा घेऊन आपण अस्वच्छता, अनारोग्य आणि कोरोना विषाणूला कायमचा हद्दपार करूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेनी करत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचप्रमाणे जन्माष्टमी नंतरच्या दहीहंडी कार्यक्रम सुद्धा संक्रमण वाढणार नाही याची काळजी राखूया.
मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव साधेपणाने घरीच पूजा करून साजरा करावा, दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक पूजाअर्चा किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास बंदी आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षीही हा उत्सव प्रतीकात्मक स्वरूपात साजरा करावा. कोरोनाचा प्रादुर्भाव अजून वाढू नये यासाठी दहीहंडी उत्सव एकत्रित येऊन गर्दी करून साजरा करू नये. मानवी मनोरे उभारून दहीहंडी सार्वजनिकरित्या साजरी करू नये. त्याऐवजी रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे, असे गृहविभागाने स्पष्ट केले होते.
परंतु, राज्य सरकारने दहीहंडी उत्सव साजरा करण्यास कोरोनामुळे मनाई केली असल्याने भाजपा, मनसेने याला कडाडून विरोध केला असून ठाणे, मुंबईत दहीहंडी उत्सव साजरा करणार असल्याचे मनसेने ठणकावून सांगितले होते. यामुळे पोलिस बंदोबस्त असूनही सारे निर्बंध झुगारून मनसेने ठाणे, मुंबईमध्ये ठिकठिकाणी रात्री, पहाटेच्या सुमारास दहीहंडी उभारून, मानवी मनोरे उभारत दहीहंड्या फोडल्या. त्या कार्य़कर्त्यांना अटक झाली, परंतू रात्री २ च्या सुमारास तात्काळ जामिनावर त्यांची मुक्तता ही करण्यात आली.
या संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत कृष्णकुंजवर पत्रकार परिषदेत घेतली, त्यामध्ये ते म्हणाले कि, “ते” घराबाहेर पडत नाहीत त्याला आम्ही काय करणार? लॉकडाऊन आवडे सरकारला अशी अवस्था सध्या झाली आहे. हा काय समुद्र आहे का? दुसरी लाट, तिसरी लाट आणि चौथी लाटयायला ! सरकार विनाकारण अशी भीती घालत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
सरकारला जनआशीर्वाद यात्रा चालते. पण हिंदूंचे सण साजरे करायला मात्र बंदी. मंदिरे अद्यापही उघडलेली नाहीत. कोरोना फक्त काय हिंदूंच्या सणांमध्येच पसरतो का? राजकीय यात्रांमध्ये नाही ? सत्ताधाऱ्यांसाठी नियम वेगळे आखले आहेत का? आम्ही दहीहंडी फोडायची नाही का? असे घणाघाती सवालांच्या फैरी झाडत राज ठाकरे यांनी सरकारवर जळजळीत टीका केली आहे.
मनोरा रचून हंडी फोडायची नाही, मग काय खुर्चीवर चढून फोडायची का? अस्वलाच्या अंगावर केस किती आहेत हे जसं आपण मोजत नाही. तसं आम्ही हिंदू सणांसाठी अंगावर किती केसेस पडल्यात ते मोजत नाही.