कोकण रेल्वे ही स्वायत्त संस्था असल्याने प्रवाशांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागते. ब्रीज, सरकते जिने, पिण्याचे पाणी, दुहेरीकरण अशी अनेक महत्त्वाची कामे मागील २५ वर्षे रखडली आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण होणे गरजेचे आहे. रखडलेल्या कामांना मोठ्या प्रमाणात निधी मिळून सोयीसुविधा झाल्यास प्रवाशांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. त्याबाबत कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने पुढाकार घेऊन याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करावे व सावंतवाडी टर्मिनसला प्रा. मधू दंडवते यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या निर्मितीवेळी २२ टक्के गुंतवणूक महाराष्ट्र राज्याने केली आहे.
कोकण रेल्वे ही स्वायत्त संस्था असल्यामुळे निधी अभावी प्लाटफॉर्मला शेड नाही. ब्रीज, सरकते जिने, पिण्याचे पाणी, स्पीकर, अस्वच्छ बाथरूम व रेल्वेचे दुहेरीकरण अशी अनेक महत्त्वाची कामे मागील २५ वर्षे रखडली आहेत. सावंतवाडी टर्मिनसचा रखडलेला प्रश्न मार्गी लागताना नवीन रेल्वेगाड्याही वाढवता येणे शक्य होणार असल्याचे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे. सावंतवाडी टर्मिनसचे काम अर्धवट असून, त्याला निधी मंजूर करून ते पूर्ण करावे आणि या सावंतवाडी टर्मिनसला कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधू दंडवते यांचे नाव देण्यात यावे. त्याचा ठराव करून त्याद्वारे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचेही निवेदनाद्वारे सूचित करण्यात आले आहे.
तीन राज्यांनी दिली परवानगी – कोकण रेल्वेच्या विलीनीकरणासंदर्भात गोवा, कर्नाटक व केरळ राज्य सरकार व तेथील लोकप्रतिनिधींनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रोहा ते मडुरा हा भाग भारतीय रेल्वेच्या मध्यरेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यासाठी केंद्राकडे शिफारस करावी, असे निवेदनात म्हटले आहे.