संगमेश्वर तालुक्यातील मारळ गावात सह्याद्रीच्या शिखरात वसलेले मार्लेश्वर देवस्थान हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. ते असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे; मात्र त्या देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याची ठिकठिकाणी झालेली दुरवस्था पर्यटकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी मागणी पर्यटकांकडूनच नव्हे, तर स्थानिकांकडूनही होत आहे. मार्लेश्वर येथे मकरसंक्रातीला मोठा उत्सव साजरा केला जातो. त्या उत्साहातील मार्लेश्वर-गिरिजादेवीचा विवाह सोहळा (कल्याण विधी) हा महत्त्वाचा कार्यक्रम असून, तो पाहण्यासाठी दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक गर्दी करतात. येथील मुरादपूर ते मार्लेश्वर रस्ता डांबरीकरण काम २०२३ रोजी पूर्ण झाले असून, मारळ ते बोंड्येदरम्यान मनीष अणेराव यांच्या घरासमोरील काही भाग आणि मारळ-मार्लेश्वरदरम्यान असलेल्या ओढ्यावरील भाग असे दोन भागातील रस्ता अद्यापही कच्चा आहे.
त्यामुळे दरवर्षी या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना मोठी गौरसोय होते. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे. मार्लेश्वर यात्रोत्सवापूर्वी किमान रस्त्याची दुरुस्ती झाली तर नियमित येणाऱ्या भक्तांचा प्रवास सुकर होईल. या संदर्भात मार्लेश्वर ग्रामपंचायतीतर्फे देवरूख सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाला ग्रामस्थांनी निवेदनही दिले आहे. त्याची दखल घेऊन अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला सूचना द्याव्यात, अशीही सूचना करण्यात आली आहे. दरम्यान, कोकणात येणारा पर्यटक धार्मिक स्थळं पाहण्यासाठी मार्लेश्वरची निवड करतो. त्याचबरोबर शैक्षणिक सहलींमध्ये हे ठिकाण सर्वाधिक प्रसिद्ध आहे. त्यामुळे अशा प्रसिद्ध ठिकाणी जाण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे, अशी पर्यटकांची मागणी आहे.