तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीने बांगलादेशी नागरिकाला खोटा जन्मदाखला दिल्याने चौकशी सुरू झाली आहे. यामध्ये आज भाजपने पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना निवेदन देत शिरगाव ग्रामपंचायतीने गेल्या १० वर्षांत दिलेल्या जन्मदाखल्यांची चौकशीची मागणी केली आहे. तसेच दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली. बांगलादेशात हिंदूंवर अन्याय होत आहेत आणि रत्नागिरीजवळच्या ग्रामपंचायतीकडून शिरगाव बांगलादेशी नागरिकाला खोटा जन्मदाखला दिला जातो. याबाबत भाजपने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. या गंभीर गुन्ह्याची सखोल चौकशी आणि मागील १० वर्षात सर्व ग्रामपंचायतींनी दिलेल्या जन्मदाखल्यांची चौकशी करावी, असे भाजपने म्हटले आहे. तसेच यातील दोषींवर गुन्हे दाखल करावे यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षकांची भेट घेतली.
भाजपचे शिर्डी येथे अधिवेशन आहे. त्या ठिकाणी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील या संदर्भातील पत्र देण्यात येणार आहे. दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजपने केली आहे. या वेळी जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे, जिल्हा उपाध्यक्ष नंदू चव्हाण, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वर्षा ढेकणे, सुप्रिया रसाळ, युवा मोर्चा प्रदेश सचिव विक्रांत जैन, जिल्हा उपाध्यक्ष बाबू सुर्वे, मंडल खजिनदार शैलेश बेर्डे उपस्थित होते.