एसटी महामंडळाची काही धोरणं आर्थिक खाईत लोटणारी ठरत आहेत. रत्नागिरी एसटी विभागाच्या जिल्ह्याला ८५० गाड्या होत्या. त्यापैकी अनेक गाड्यांचे वयोमान संपल्याने त्या भंगारात काढल्या. त्या बदल्यात मोजक्याच नवीन गाड्या मिळाल्या. अनेक गाड्यांची दुरुस्ती सुरू आहे, काही वापरात नाहीत. त्यामुळे आता ६७० गाड्याच प्रवासी सेवेत आहेत. गाड्यांची कमी भरून काढण्यासाठी महामंडळाने नवीन बस खरेदी न करता ४० खासगी बसेस चालवायला घेतल्या आहेत. या बसेसना प्रत्येक किमीला ४७ रुपयेप्रमाणे भाडे घेत आहेत. कंपनीचा चालक आणि महामंडळाचा वाहक अशी आगळीवेगळी एसटीची सार्वजनिक प्रवासी वाहतूक सध्या जिल्ह्यात सुरू आहे. एसटी महामंडळाची सार्वजनिक वाहतूक सेवा दिवसेंदिवस सुधारण्याचा प्रयत्न सुरू आहे. खासगी प्रवासी वाहतुकीला टक्कर देण्यासाठी वातानुकूलित, टु बाय टू, लालपरी, अनेक सुविधा असलेल्या नवीन गाड्या एसटीच्या ताफ्यात आल्या; परंतु महामंडळाचा तोटा भरून निघेल अशी कोणतीच योजना चालली नाही.
त्यानंतर कोरोनाचा काळ आणि एसटी कर्मचाऱ्यांचा संपर्क या घटनांनी तर एसटीचे आर्थिक कंबरडे मोडले. प्रवासी घटल्याने एसटीने तोटा भरून काढण्यासाठी स्वतंत्र कार्गो (मालवाहतूक) सेवा सुरू केली. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. एसटीची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने गरजेप्रमाणे नवीन गाड्या खरेदी करणे महामंडळाला शक्य नव्हते. त्याला पर्याय म्हणून महामंडळाने खासगी गाड्या एसटीच्या ताफ्यात घेण्याचा निर्णय घेतला. साई टुर्स कंपनीच्या महामंडळाने रत्नागिरी एसटी विभागासाठी ४० गाड्या भाड्याने घेतल्या. या गाड्यांची देखभाल दुरुस्ती, डिझेलची जबाबदारी कंपनीची. एसटी महामंडळ या गाड्यांना प्रत्येक किमीमागे ४७ रुपये देणार. गाड्या जेवढ्या किमी चालणार तेवढे भाडे या कंपन्यांना महामंडळ देणार.
खासगी कंपन्यांना परवडते, एसटीचे काय ? – खासगी कंपन्यांना सर्व देखभाल दुरुस्ती, डिझेल देऊन ४७ रुपये प्रत्येक किमीला घेऊन ही सेवा देण्यास परवडत असले तर एसटीच्या साध्या गाड्यांना प्रत्येक किमीला ५३ रुपये देऊनही का परवडत नाही, हा संशोधनाचा विषय आहे. एसटीच्या साध्या गाड्यांना खर्चदेखील प्रत्येक किमीला ६० रुपये येत आहे म्हणजे सात रुपये तोटा प्रत्येक किमीला एसटीला सहन करावा लागत आहे.