मुंबई-गोवा महामार्गावरून संगमेश्वर-देवरूखमार्गे कोल्हापूरकडे जाणाऱ्या राज्यमार्गाची पावसाळ्यापासून दुरवस्था झाली होती. या मार्गावरील मोठमोठ्या खड्यांमुळे अनेक अपघात घडले. याबाबत वाहनचालक आणि प्रवाशांनी सातत्याने ओरड केल्यानंतर या मार्गाची डागडुजी केली; मात्र आता खासगी कंपन्यांनी इंटरनेटच्या केबल टाकण्यासाठी संगमेश्वर-देवरूख मार्गाची अनेक ठिकाणी खोदाई सुरू केली आहे. या खोदाईत रस्त्यालगत असणारे गाईडस्टोनही उखडण्यात आले असून, ठिकठिकाणी रस्ता धोकादायक बनला आहे. गेले काही दिवस संगमेश्वर- देवरूख मार्गावर अनेक ठिकाणी खासगी कंपनीकडून इंटरनेटची केबल टाकण्यासाठी खोदाईचे काम सुरू आहे. याबाबत राज्यमार्गावरील गावात असणाऱ्या ग्रामपंचायतींना विश्वासात घेतले नसल्याने अथवा त्यांच्याकडून कोणतीही लेखी परवानगी घेतली नसल्याने काही ठिकाणी ग्रामपंचायतीच्या पाणीयोजनेचे पाईपही तुटले आहेत.
लोवले, बुरंबी, करंबेळे, कोसुंब आदी गावातून केबल टाकण्यासाठी खोदलेले मोठे चर व्यवस्थित न बुजवल्याने धोकादायक बनले आहेत. खोदलेले चर बुजवताना योग्य ती काळजी घेतली जात नसल्याने रस्त्यावर राहणाऱ्या मातीमुळे धुळीचे लोट घरांमध्ये जात आहेत. साडवली लघुउद्योगिक वसाहतीत रस्त्यालगत रात्रीच्यावेळी उजेड असावा, या हेतूने विद्युतखांब उभारून प्रखर प्रकाशझोताची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली; मात्र कंपनीने केबल टाकताना जी खोदाई केली त्यामध्ये या विद्युतखांबांच्या केबलला अनेक ठिकाणी हानी पोचली आहे. याबरोबरच यातील एक खांब अर्ध्यावर मोडून टाकण्यात आला आहे. महावितरणच्या विविध केंद्राजवळ रस्त्याचे किलोमीटर दर्शवणारे दगड उखडून गटारात टाकून देण्यात आले आहेत.
उन्हाळ्यातच झाडे लावण्याची तयारी – ही खोदाई सुरू असतानाच बांधकाम विभागाने साखरपा-संगमेश्वरदरम्यान झाडे लावण्यासाठी जागोजागी खड्डे मारण्याचे काम सुरू केले आहे. या मार्गावरील मोठी झाडे चार वर्षांपूर्वी तोडण्यात आली होती. आता त्याच जागेवर नवीन झाडे आणि तीही ऐन उन्हाळ्यात लावण्यामागील बांधकाम विभागाचा हेतू न समजण्यासारखा आहे.