उद्धव ठाकरेंचे एकनिष्ठ म्हणवले जाणारे माजी आमदार राजन साळवी यांनी गुरूवारी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या या पक्ष प्रवेशाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. शिदेसेनेचं बळ वाढल्याची चर्चा सुरू झाली. पण ही चर्चा औटघटकेचीच ठरली आहे. शिंदेंच्या शिवसेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याची तयारी केली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. राजन साळवी यांनी धनुष्यबाण हाती घेताच कोकणातील शिंदे गटात नाराजीचे फटाके फुटू लागले आहेत. साळवींच्या पक्षप्रवेशानंतर राजापूर-लांजा मतदारसंघात पदाधिकाऱ्यांत प्रचंड नाराजी पसरली आहे. मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अनेक कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. पदाधिकाऱ्यांनीही थेट इशाराच दिला आहे.
राजन साळवी आम्हांला नकोत, शिंदे साहेबांनी त्यांना आमच्यावर लादू नये आणि जर हा पक्षप्रवेश झालेला आहे तर राजन साळवी यांची कोणतीही ढवळाढवळ आमच्या मतदारसंघात होऊ देणार नाही असा इशारा नाराज पदाधिकाऱ्यांनी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात शुक्रवारी दिवसभर सुरू होती. राजन साळवी यांना विकास करायचा असेल तर त्यांनी तो अन्यत्र कुठेही करावा. पण आमच्या मतदारसंघात १५ वर्षात काय विकास केला. तो दिसून आला आहे. ज्यांना मतदारांनी नाकारलं अशा आमदाराला पुन्हा आमच्या डोक्यावर बसवू नये. त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत आम्ही कोणतेही संबंध ठेवणार नाही. आम्ही कोणतेही काम करणार नाही असे मत नाराज शिंदेसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले, आता या नाराजीची पालकमंत्री ना. सामंत आणि आमदार किरण सामंत कशी दखल घेतात आणि त्यांची नाराजी कशी दूर करतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.