रत्नागिरी शहराची वाहतूक समस्या काही नवीन नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून हे सुरू आहे. कोरोना महामारीमध्ये देखील शहराचे डांबरीकरण आणि सीएनजी गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी झालेली खोदाई, त्यात पडलेला पाऊस आणि निसरडे झालेले रस्ते त्यानंतर करण्यात आलेले डांबरीकरण आणि अवघ्या तीन महिन्यात उखडलेले डांबरीकरण. या सर्व गोष्टी रत्नागिरीकर विसरलेले नाहीत. गेल्या पाच वर्षांमध्ये रत्नागिरी शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी सुमारे दीडशे कोटींहून अधिक निधी खर्च झाला आहे; परंतु त्यानंतर मंजूर झालेल्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने आजही वाहतूककोंडी कायम आहे. अजून किती दिवस वाहतूक समस्येचा पाढा गिरवायचा, असा सवाल आता रत्नागिरीकर विचारत आहेत. बरे, इतके कोटी खर्च करूनही बाजारपेठेतील रस्त्यावरील खड्डे कायम आहेत. शहरात जास्त भेडसावणारी समस्या आहे ती वाहतुकीची.
मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने तो भविष्यात ८० फुटी होऊन मुख्य मार्गावरील वाहतूककोंडी सुटेलदेखील; परंतु मुख्य बाजारपेठेतील एकेरी आणि दुहेरी मार्ग दिशादर्शक फलक कुठेच दिसत नाही. या मार्गांवर होणारे अतिक्रमण हे वाहतूककोंडीला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे शहरातील एकेरी मार्ग हे वाहनधारकांना गोंधळात टाकणारे आहेत; परंतु वनवे दर्शवणारे ठळक असे कुठेच फलक नाहीत. फलक नसल्यामुळे येणारे पर्यटक, नवखे वाहनधारक बाजारपेठेत गोंधळून जातात. बाजारपेठेतून बाहेर कसे पडावे, हे त्याला कळत नाही. गोखलेनाक्यावर कधीतरी वाहतूक पोलिस असतात तेव्हा ठीक आहे; परंतु इतरवेळी काही वाहनधारक वनवेमध्ये शिरतात आणि वाहतूककोंडी होते. याबाबत वारंवार व्यापारीसंघ, रिक्षा संघटनांनी वाहतूक पोलिस, पालिकेला सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वाहतूक पोलिसांनी यावर गांभीयनि लक्ष देऊन शहरातील वनवेमुळे होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
शहरातील एकेरी मार्ग – शहरात गोगटे कॉलेजचा रोड, कंदील लॉज ते गोखलेनाका, धनजीनाका ते राधाकृष्ण मंदिर, गोखलेनाका ते राममंदिर, मच्छीमार्केट ते धनजीनाका, विठ्ठल मंदिर ते गोखलेनाका हे सर्व मार्ग एकेरी मार्ग (एकेरी) आहेत.