रत्नागिरी नगर परिषदेला मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या घरपट्टी वसुलीचे मोठे आव्हानच समोर ठाकले आहे. २०२०-२१ आर्थिक वर्षासाठीची घरपट्टी वसुलीची मोहीम सुरू करण्यात आली आहे, परंतु, वर्ष संपायला आले तरी त्याला प्रतिसाद अत्यल्प मिळत आहे. दीड वर्ष कोरोना महामारीमध्ये जनता होरपळली असून, घरपट्टी वसुलीचे मोठे आव्हानच नगर परिषदेसमोर उभे राहिले आहे.
कोरोनामुळे घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट वाढून १४ कोटी इतके झाले आहे. १४ कोटी उद्दिष्ट असताना त्यातील फक्त ८ कोटी वसूल झाले असून अजून ६ कोटी थकबाकी शिल्लक आहे. कर्मचाऱ्यांना दरदिवशी ५०० घरांना नोटीस बजावण्याचे टार्गेट पालिकेने दिले आहे. तसेच अनेकांना थकीत घरपट्टीची मागणी बिले मिळालेली नाहीत.
नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी प्रत्यक्ष नोटीस गेल्यावर वसुलीला प्रतिसाद मिळेल या शक्यतेने मालमत्ता विभागाला कामाला जुंपले आहे. थकीत इमलेधारकांना घरपट्टीची मागणी बिले देऊन त्यांच्याकडून वसुली करण्यात येणार आहे. त्यासाठी मालमत्ता विभाग आणि शिपाई यांच्यामार्फत नोटीस बजावण्यात किंवा चिकटवण्यात येत आहेत. शहरातील संचयनीसह अनेक बुडीत गेलेल्या कंपन्यांची थकबाकी एक कोटींची घरामध्ये आहे. त्याचप्रमाणे इमलेधारकांनी वेळीच थकीत घरपट्टी न भरल्यास जप्तीची कारवाई सुद्धा करण्यात येईल, असा सूचक इशाराच रत्नागिरी नगर पालिकेने दिला आहे.
मालमत्ता विभाग आणि १४ शिपायांपैकी ८ जण शहरातील साडे चौदा हजार इमलेधारकांना घरपट्टी मागणी बिले देण्यासाठी कामाला लागले असून, उर्वरित वसुलीसाठी प्रयत्न करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पालिका ऑफिसमध्ये गर्दी न करता, ऑनलाईन पद्धतीने घरपट्टी भरून सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.